‘सूर्या’ चित्रपटातून मराठीला मिळणार नवा ॲक्शन हिरो

surya
surya

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज एकीकडे बॅाक्स ऑफिसवर दक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला आहे. तर दुसरीकडे देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये मराठीचा डंका वाजतोय.  आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून ठेवणारे ॲक्शनपटचीही निर्मिती होत आहे.अंगावर रोमांच आणणारे स्टंटस आता मराठी चित्रपटातही पहायला मिळणार आहेत. नाविन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीतही धडाकेबाज ॲक्शनपट येणार आहे.

मराठमोळा 'सूर्या' अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'सूर्या' या आगामी मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत एस. पी. मोशन पिक्चर्सचा 'सूर्या' हा ॲक्शनपॅक्ड चित्रपट २०२३ या नव्या वर्षातील पहिल्या आठवड्यात ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

हसनैन हैद्राबादवाला यांनी दिग्दर्शित केलेल्या 'सूर्या' चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीच्या पटलावर एका नव्या  ॲक्शन हिरोचा उदय होणार आहे. भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेला प्रसाद मंगेश हा 'सूर्या'मध्ये मुख्‍य भूमिकेत आहे. 'स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना कुटुंब आणि प्रेमावर घाला घालणाऱ्या खलनायकाला धोबीपछाड देणारा 'सूर्या' प्रेक्षकांच्‍या भेटीला येणार आहे.

याबाबत प्रसाद मंगेश म्हणाला की, 'सूर्या'च्या रूपात नायक बनून प्रेक्षकांसमोर येत असल्याचा आनंद आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना  मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेजच पहायला मिळणार आहे. लेखक मंगेश ठाणगे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या 'सूर्या'च्या कथेवर मंगेश ठाणगे यांनी विजय कदम यांच्या साथीनं पटकथा लिहिली आहे. विजय कदम, मंगेश केदार आणि हेमंत एदलाबादकर यांचे संवादलेखनआहे.

या चित्रपटात प्रसाद मंगेश सोबत अखिलेंद्र मिश्रा, हेमंत बिर्जे, उदय टिकेकर, पंकज विष्णू, अरुण नलावडे, गणेश यादव, संजीवनी जाधव, रुचिता जाधव, देवशी खांधुरी, हॅरी जोश, राघवेंद्र कडकोळ, दीपज्योती नाईक, प्रताप बोऱ्हाडे आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

डिओपी मधु एस. राव यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन राहुल भातणकर यांनी केलं आहे.  साहस दृश्ये आणि स्टंटस अॅक्शन दिग्दर्शक अब्बास अली मोगल आणि कौशल मोझेस यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रीत करण्यात आली आहेत. गीतकार बाबा चव्हाण, संतोष दरेकर, संतोष मिश्रा, देव चौहान यांच्‍या गीतांना  देव चौहान यांनी संगीत दिले आहे. गणेश आचार्य, उमेश जाधव, राहुल संजीव यांनी  कोरिओगाफी केली आहे. रेश्मा मंगेश ठाणगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद मंगेश, चेतन मंगेश हे या चित्रटाचे सहनिर्माते आहेत. संग्राम शिर्के या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news