‘मेरे देश की धरती’ चित्रपटाचे या दिवशी होणार रिलीज | पुढारी

‘मेरे देश की धरती’ चित्रपटाचे या दिवशी होणार रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘तरुणांचा देश’ म्हणून आपल्या देशाचा नावलौकिक आहे. समाजात बदल घडविण्यासाठी धडपडणारी तरुणाई काय करू शकते हे दाखवून देणारा ‘कार्निवल मोशन पिक्चर्स’ ‘निर्मित ‘मेरे देश की धरती’ हा हिंदी चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

‘कार्निवल मोशन पिक्चर्स’चा ‘मेरे देश की धरती’ हा हिंदी चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. मिर्झापूर फेम दिव्यांदू शर्मा, अनुप्रिया गोएंका आणि अनंत विधात या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्या सुद्धा या चित्रपटात भूमिका आहे.

शेतकऱ्यांप्रती काहीतरी करण्याच्या उद्देशाने भारावलेले दोन इंजिनिअर्स तरुण आपल्या गावाचा कसा कायापालट करतात याची कथा ‘मेरे देश की धरती… देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे. ‘मेरे देश की धरती’ ही कलाकृती प्रबोधनासोबत देशातील तरुणाईला कृषी क्षेत्रात क्रांतिकारी विचारांकडे नेणारी, तसेच सह-कुटुंब सह-परिवार बघता येणारी भावपूर्ण अनुभूती आहे, असा विश्वास कार्निवल मोशन पिक्चर्सच्या संस्थापक आणि संचालिका वैशाली सरवणकर व्यक्त करतात.

‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत भासी यांची आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले आहे. छायांकन हरी वेदांतम यांचे आहे.

Back to top button