‘या’ मंत्र्यांनी बारा तास पोहून वाचवले स्वतःचे प्राण | पुढारी

'या' मंत्र्यांनी बारा तास पोहून वाचवले स्वतःचे प्राण

लंडन ः मंत्री आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा काही संबंध असतो असे आपल्याला एरव्ही वाटणार नाही. मात्र, सध्याच्या काळात अनेक मंत्रीही फिटनेसवर भर देत असताना दिसून येत आहे. आफ्रिकेतील मादागास्कर च्या एका मंत्रिमहोदयांनी तर याबाबत जगासमोर एक नवा आदर्शच ठेवला आहे. त्यांचे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळल्यावर त्यांनी बारा तास पोहून किनारा गाठला व स्वतःचा जीव वाचवला!

या देशाच्या ईशान्येकडे असणार्‍या समुद्रकिनार्‍याजवळ एक प्रवासी जहाज बुडाले. त्यामधील लोकांना वाचवण्यासाठी मोहीम सुरू होती. जहाजामधील 39 लोकांना जलसमाधी मिळाली, मात्र 90 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले. या बचावकार्यासाठीच देशातील पोलिसविषयक मंत्रालयाचे मंत्री सर्ज गेले हे हेलिकॉप्टरमधून गेले होते. त्यांचे हेलिकॉप्टर समुद्रात क्रॅश झाले. त्यानंतर त्यांनी सुमारे बारा तास समुद्रात पोहत स्वतःचा जीव वाचवला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर सर्ज आणि त्यांचे एक सहकारी समुद्रात पडले. या दोघांनी पोहून महंबो हा समुद्रकिनारा गाठला. तिथे ते ‘माझ्या मरणाची वेळ अजून जवळ आलेली नाही’ असे लोकांना सांगितले! समुद्रात क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरमधील सर्वांचा जीव वाचला आहे हे विशेष! ( मादागास्कर )

Back to top button