हैदराबाद; वृत्तसंस्था : आयपीएलच्या गत हंगामात सनरायजर्स हैदराबादची कामगिरी फारच निराशाजनक झाली होती. दरम्यान, हे अपयश विसरून पुन्हा आयपीएल चॅम्पियन बनण्यासाठी सनरायजर्सने मोर्चेबांधणी केली आहे. वेस्ट इंडिजचा महान माजी फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज डेल स्टेन हे आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादच्या संघात दाखल झाले आहेत.
ब्रायन लाराकडे सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजी प्रशिक्षकाची तर डेल स्टेनकडे संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ब्रायन लारा आणि डेल स्टेन यांचा समावेश झाल्याने सनरायजर्सच्या प्रशिक्षक वर्गाची फळी भक्कम होणार आहे. तसेच, संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी ही टॉम मुडी यांच्याकडे कायम राहणार आहे.
तर, ब्रायन लारांकडे संघाचा धोरणात्मक सल्लागार ही जबाबदारी सोपवली आहे. सायमन कॅटीच साहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. तर, भारताचा माजी क्रिकेटपटू हेमांग बदानी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आणि स्काऊट अशी दुहेरी जबाबदारी पार पाडेल. मुथय्या मुरलीधरन फिरकी गोलंदाजांच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. सोबतच तो संघाची रणनीती ठरवण्याचेही काम करतो.
ब्रायन लाराने 133 कसोटींमध्ये 34 शतके आणि 48 अर्धशतकांसह 11 हजार 953 धावा फटकावल्या होत्या. तर, 299 वन-डेमध्ये त्याने 19 शतकांसह 10 हजार 405 धावा कुटल्या होत्या. तसेच, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात 501 धावा कुटण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावे आहे.
डेल स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 699 विकेटस् टिपल्या आहेत. त्यामध्ये 93 कसोटींमध्ये 435 विकेट आणि 125 वन-डेंमध्ये 196 आणि 43 टी-20 मध्ये 63 विकेटस् टिपल्या आहेत. तसेच, डेल स्टेन तब्बल 2 हजार 243 दिवस कसोटी क्रमवारीतील अव्वल गोलंदाज राहिला होता हा एक विश्वविक्रम आहे.
गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी
2021 च्या हंगामात सनरायजर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक झाली होती. एकूण 14 सामन्यांपैकी केवळ तीन सामन्यांमध्येच त्यांना विजय मिळवता आला होता. तर 11 सामन्यांत हैदराबादचा पराभव झाला होता. दरम्यान, संघव्यवस्थापनाने संघाच्या नेतृत्वात बदल करताना डेव्हिड वॉर्नर कडून कर्णधारपद काढून घेत केन विल्यम्सनकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, त्यालाही फार काही कमाल करता आली नव्हती. हा हंगाम संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि राशीद खान यांनी सनरायजर्स हैदराबादची साथ सोडली आहे.