Muslim Reservation : “महाविकास आघाडीने मुस्लिमांना आरक्षण द्यावे” | पुढारी

Muslim Reservation : "महाविकास आघाडीने मुस्लिमांना आरक्षण द्यावे"

पुढारी ऑनलाईन डेस्क : काॅंग्रेसच्या एका नेत्याने मुस्लीम समाजाला आरक्षण (Muslim Reservation) देण्याची मागणी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातील मुस्लीम समाजाला लवकरात लवकर नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे पत्र काॅंग्रेसचे नेते नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षातील इतर नेत्यांना दिले आहे.

५ टक्के आरक्षणाची मागणी

महाराष्ट्रातील काॅंग्रेसचे नेते नसीम खान यांनी बुधवारी सांगितले की, “महाविकास आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण (Muslim Reservation) लागू करावे. नसीम खान हे महाविकास आघाडीचे माजी मंत्री आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, “शिवसेनेचं नेतृत्व असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी काॅंग्रेसला हे निश्चित करावे लागेल की, अल्पसंख्याकांना विविध योजनांद्वारे योग्य ते अनुदान द्यावे.”

उद्धव ठाकरे यांना लिहिले पत्र

नसीम खान यांनी आपल्या मागण्यासांठी उद्धव ठाकरे यांना आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिलं आहे. त्याचबरोबर इतर काॅंग्रेसच्या नेत्यांनादेखील त्यांनी मुस्लीम आरक्षणासाठी आग्रह केलेला आहे. तसेच याबाबतीत लवकर निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी केलेली आहे.

असा केला नसीम खान यांनी दावा

मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लीम कोटा देण्याला मंजूरी दिलेली होती, याचा आधार घेत मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याची मागणी नसीम खान यांनी केली आहे. मात्र, एनडीएच्या मागील सरकारने लागू केले नाही. आता राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, तरीही मुस्लीम आरक्षणाबद्दल कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. काॅमन मिनिमम प्रोग्रॅम यावर ही महाविकास आघाडी सरकार बनलेले आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यावा, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button