Reena Madhukar : ‘ही’ अभिनेत्री आहे सलमान खानची मोठी फॅन | पुढारी

Reena Madhukar : 'ही' अभिनेत्री आहे सलमान खानची मोठी फॅन

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वालिया शिकलगार

सध्या मन उडू उडू झालं मालिकेतील अभिनेत्री रीना मधुकर हिची चर्चा होतेय. रीना मधुकर (Reena Madhukar) हिने अनेक मालिका, हिंदी चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम केलंय. अजिंठा या चित्रपटातून मराठी सिनेविश्वात पदार्पण करणारी सुंदर रीनाची मन उडू उडू झालं ही पहिली मालिका आहे. तिचा (Reena Madhukar) इथवरचा प्रवास आणि तिच्या अभिनयाविषयी ‘पुढारी ऑनलाईन’शी तिने बातचीत केली.

हिंदीनंतर मराठीत काम करतेय, काय नवीन अनुभवायला मिळतंय?

रीना : माझी सुरुवातचं मराठी चित्रपट अजिंठामधून झाली होती. नितीन देसाईंच्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सोबत काम केलं. यामध्ये माझी कमला नावाची भूमिका होती. येथून माझ्या करिअरची सुरुवात झाली. पुढे हिंदीमध्ये काम केलं. पण, मराठी कधीचं सोडलं नव्हतं. मराठी माझं माहेर असल्यासारखं आहे. चांगल काम मला करायचं होतं. त्यात चित्रपट, मालिका, वेबरीरीज अशी कुठलीही माध्यमं असो. चांगल्या भूमिका कुठल्याही भाषेतील असल्या तरी त्या भूमिका मी स्वीकारते.

एखाद्या भूमिकेसाठी वजन वाढवायचं आहे, तर होकार देशील का?

रीना : जर स्क्रिप्टची गरज असेल तर नक्कीचं वजन वाढवेन. अजिंठामध्ये एका आदिवासीची भूमिका केलीय. झाला बोभाटामध्ये एका गावकरीची भूमिका मी केलीय. ३१ दिवस चित्रपटात अंध मुलीची भूमिका केली. एक अभिनेत्री म्हणून मी फिट राहते. असं नाहीये. माझं हे पहिल्यापासूनचं रुटीन आहे. वेगवेगळं आयुष्य जगताना आम्हाला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात.

आवडता कलाकार कोणता? एखादी आठवण सांगशील?

रीना : सलमान खान माझा आवडता अभिनेता आहे. त्याला मी भेटलेय. जेव्ही मी पहिल्यांदा सलमानला समोर भेटले. त्यावेळी मला विश्वास बसत नव्हता की तो माझ्या समोर आहे. ज्यावेळी मी सलमानला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी त्याला असं म्हटलं होतं की- प्लीज तुम्हाला टच करून पाहू का? तेव्हा खरंच मी त्याला बोटाने टच करून पाहिलं होतं. अजुनही मी त्याला भेटले की, माझी बोलती बंद होते.

तुला ट्रॅव्हल करायला आवडतं. मग, ट्रॅव्हलर ब्लॉग सुरू करावा, असं वाटलं का?

रीना : मला मनात बऱ्याचं वेळेला आलं की, ट्रॅव्हलिंग ब्लॉग सुरू करावं. पण, जेव्हा ब्लॉगर व्हायचं म्हटलं तर तो अनुभव घेणं, निसर्ग पाहणं होतं. हे सर्व करताना ब्लॉगर म्हणून मी काम करू शकले नसते. त्यामुळे एक ब्लॉगर म्हऩून काम करताना ती मजा, तो अनुभव मला घेता आला नसता.

तुला आजही आठवते ती आठवण कोणती?

रीना : आठवणी खूप साऱ्या आहेत. शाळेतील भरपूर आठवणी आहेत. शाळेत असताना मी खूप मस्तीखोर होते. तो शाळेचा ड्रेस घालून पुन्हा बेंचवर जाऊन बसावं. मस्ती करावी. बालपण पुन्हा परत यावं, अनुभवावं असं वाटतंय. बालपणाचं आयुष्य बेफिकिरीवालं असतं. जगाची चिंता नसते. सर्वजण आपापल्या जीवनात आहेत. काही जण परदेशात आहेत. त्यामुळे मित्रमंडळींशी फारसा संपर्क नसतो.

मला नेहमीचं डान्सिंग हे डोळ्यासमोर आहे. मी राजस्थानी फोक डान्सर आहे. त्यामध्ये मी मास्टर केलंय. अभिनयात आल्यापासून मी सध्या डान्सपासून दूर आहे. जेव्हा मला वेळ मिळेल, तेव्हा मला डान्स करायचं आहे. मी मुळची पुण्याची आहे. माझा जन्म, शिक्षण पुण्यातील आहे. माझा डान्स क्लासही पुण्यात होता.

अभिनयाव्यतिरिक्त आणखी काय करावसं वाटतं?

रीना : डान्सिंगमध्येचं मला करिअर करायचं होतं. अभिनयात यायचं असं काही ठरवलं नव्हतं. शिक्षण घेऊन मला एखादी नोकरी करायची नव्हती. लहानपणापासून एअर होस्टेस व्हायचीही इच्छा होती. एकदा पुण्यात जेट एअरवेजच्या मुलाखती सुरू होत्या. तेव्हा मी मुलाखतीसाठी गेले होते. साडेआठशे मुलींमधून तीन मुली निवडल्या गेल्या. निवडलेल्यांपैकी मी एक होते. मी मुंबईत आले. जेट एअरवेजचं काम सुरू असताना अभिनयात आवड निर्माण झाली.

अभिनय क्षेत्रात कसे पदार्पण झाले?

दिग्दर्शक नितीन देसाई भेटले. अजिंठामधील भूमिका माझ्या डान्सिंग स्किलमुळे मिळाली. तेव्हा असं ध्यानी-मनीदेखील नव्हतं की, मला अभिनय करायचा आहे.

जर अभिनेत्री झाली नसतीस तर कोणतं क्षेत्र निवडलं असतंस?

जर अभिनेत्री झाले नसते तर मी डान्सर झाले असते. मला डान्स शिकवायला खूप आवडतो. ज्यांना डान्स करायला येत नाही किंवा वेडिंग संगीत कोरिओग्राफीही करते. जर मी अभिनेत्री झाले नसते तर मी वेडिंग संगीतमध्ये असते.

आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगशील?

रीना : देव देव्हाऱ्यात नाही हा माझा आगामी चित्रपट आहे. विक्रम गोखले, सुहासिनी मुळये असे दिग्गज कलाकार यामध्ये आहेत. या चित्रपटात माझी मुख्य भूमिका आहे. याचे उरलेले शूटिंग सध्या सुरू आहे. वेबसीरीजच्याही ऑफर आल्या आहेत. पण, सध्या मालिकेतही काम सुरू आहे. त्यामुळे वेळेचं नियोजन करून आगामी प्रोजेक्टकडे लक्ष राहिल.

मराठी मालिका मन उडू उडू झालं याविषयी बोलताना रीना म्हणतेय-

मराठी मालिका मन उडू उडू झालंमध्ये सध्या ती दिसतेय. तिला या मालिकेची ऑफर मिळाली आणि तिने ती स्वीकारली. पँडेमिक काळात ती दोन वर्षे घरात होती. या काळात तिने कुठलेही कामे हाती घेतले नव्हते.

मंदार देवस्थळी यांचा झी मराठीवरील मन उडू उडू झालं मालिका ही तिची पहिली मराठी मालिका ठरलीय. तिने हिंदी मालिका केल्या आहेत. पण, तिला मराठी मालिका करायची इच्छा होती. ती इच्छा आता या मालिकेच्या माध्यमातून पूर्ण झालीय.

अधिक वाचा- 

 

View this post on Instagram

 

A post shared by Reena Madhukar (@reenameranaam)

Back to top button