मुंबई; पुढारी ऑनलाईन
झी मराठी वरील 'रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या तिसऱ्या भागातून शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) बाहेर पडली आहे. जिव्हाळ्याच्या शेवंता मधून बाहेर पडावे लागत असल्याबद्दल अपुर्वाने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.
"माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मी माझी भूमिका सोशल मीडियामधून मांडली. आपण दिलेल्या प्रतिसादाने मी भारावून गेले. एवढ्या प्रचंड संख्येने माझे चाहते माझ्यावर एवढं प्रेम करतात, हे पाहून मी थक्क झाले. त्याबद्दल सर्वांचे आभार मानन्यास शब्द अपुरे पडत आहेत. एक कलाकार, घडतो त्याच्या चाहत्यामुळे. एका कलाकृती घडते ती कलाकारांच्या अभिनयाने आणि प्रामाणिक प्रयत्नाने, शेवंता सुद्धा त्याचेच एक उदाहरण आहे. आपण सोशल मीडिया व प्रत्यक्ष फोनवरुन दिलेला पाठिंबा व शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत." असे अपुर्वाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तिच्या या पोस्टवर चाहत्यांना मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. 'देव तुका बरे करो…. ???❤️❤️??? होईल सगळं नीट होईल…' ???❤️ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. 'आभास हा मधील आर्या तर अजून आठवते. तितकीच सुंदर भूमिका निभावली होती' असेही एका चाहत्याने म्हटले आहे. 'मनाचं खच्चीकरण करून घेऊ नका.. प्रगतीच्या वाटेवर असे खड्डे येतचं राहतील. तुम्ही थांबू नका… तुमच्या मागे तुमचा रसिक प्रेक्षक नेहमीच खंबीरपणे उभा असेल. तुम्ही फक्त ध्येय गाठा…' असे म्हणत एका चाहत्याने अर्पुवाला पाठिंबा दर्शविला आहे.
थरारक 'रात्रीस खेळ चाले' मालिकेचे तिसरे पर्व (रात्रीस खेळ चाले ३) सुरु आहे. या मालिकेतील अण्णा आणि शेवतांची जोडी खूप गाजली. पण आता अण्णांची 'शेवंता' म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिने ही मालिका सोडली आहे. 'रात्रीस खेळ चाले'मध्ये शेवंता दिसणार नसल्याच्या चर्चेने तिच्या चाहत्यांना धक्का बसलाय.
रात्रीस खेळ चाले या मालिकेने प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळवलं. अगदी पहिल्या पर्वापासूनच या मालिकेनं लोकप्रियतेचे शिखर गाठलं. या मालिकेतील सर्व कलाकार प्रेक्षकांचे अत्यंत आवडते आहेत. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे शेवंता (अपूर्वा नेमळेकर). अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने शेवंताची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. अपुर्वानं तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच सर्वांची आकर्षण ठरली आहे. तिसऱ्या भागातही शेवंता चर्चेत राहिली आहे.