अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, बाजार समितीतही तपासणी | पुढारी

अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा, बाजार समितीतही तपासणी

जालना; पुढारी ऑनलाईन: शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील घरावर ईडीचा सकाळी छापा पडला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील साखर कारखाना विक्रीत खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता, त्यानंतर काही दिवसांत ही छापेमारी झाली आहे.

खोतकर हे माजी मंत्री असून शिवसेनेचे बडे नेते अशी त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी खोतकर यांच्यावर १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर खोतकर यांच्या घरी आज सकाळी साडेआठ वाजता ईडीचा छापा टाकला. खोतकर सध्या जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांच्या घरासमोरच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु आहे. खोतकर यांचे भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये वास्तव्य आहे. या बंगल्यात १२ जणांचे पथक तपासणी करत आहे. छापा पडताच दरवाजे बंद केले असून अन्य कुणालाही प्रवेश दिला जात नाही.

खोतकर ईडीचा छापा;  खोतकर  छाप्यावेळी घरीच

छापा पडला तेव्हा खोतकर हे घरीच होते. औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये अर्थिक संबंध जोपासले, अशी तक्रार ईडीकडे सोमय्यांनी केलेली. खोतकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आपले काही लाखांचे शेअर्स कारखान्यात आहेत. आपण भागीदार आहोत, मालक नाही, असे स्पष्टीकरण खोतकर यांनी दिले होते.

भावना गवळी यांच्यामागेही ससेमिरा

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने तिसरे समन्स (ED Notice) बजावूनही त्या चौकशीला हजर राहिल्या नाही.त गवळी यांना 24 नोव्हेंबरला ईडीकडून कार्यालयात हजर राहण्यास या समन्सद्वारे सांगण्यात आले होते.

ईडीने भावना गवळी यांना यापूर्वी दोन समन्स पाठवले होते. मात्र, त्यावेळी भावना गवळी ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाल्या नव्हत्या. खासदार भावना गवळी यांना ईडीचा तिसरा समन्स (ED Notice) आल्याने त्या यावेळी चौकशीला सामोरं जाणार की, नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, त्यांनी ईडीला सामोरे जाणे टाळले आहे.

हेही वाचा : 

Back to top button