‘इंडियन आयडल मराठी’ च्या ऑडिशनला दुमदुमला महाराष्ट्र | पुढारी

'इंडियन आयडल मराठी' च्या ऑडिशनला दुमदुमला महाराष्ट्र

पुढारी ऑनलाईन

येत्या २२ नोव्हेंबर रोजी सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार्‍या ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाची सध्या फार चर्चा आहे. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करते आहे. प्रादेशिक भाषेत ‘इंडियन आयडल मराठी’ पहिल्यांदाच सुरू होणार आहे. त्याला साजेसे असे परीक्षकही लाभले आहेत.

संगीत विश्वातील एक नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी अर्थातच महाराष्ट्राचे लाडके अजय-अतुल परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. मराठी आयडल आणि त्यातही अजय-अतुल हे परीक्षण करणार असल्याने रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.

आयडलच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असेच एकापेक्षा एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही.

अजय-अतुल यांनी मनोरंजनसृष्टीत खूप कष्टाने स्वतःचं वेगळं नाव कमावलं. त्यांच्या सांगीतिक प्रवासाचे रसिक साक्षीदार आहेत. आवाजाच्या आणि स्वरांच्या साथीने स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या मुलांचं स्वप्न सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना बघता येणार आहे.

Back to top button