पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची निवड - पुढारी

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची निवड

पुढारी ऑनलाईन :

’१९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यामध्ये मराठी स्पर्धात्मक विभागात ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटाची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये निवड होणे हे नेहमीच प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची झालेली निवड ही आमच्या टीमसाठी आनंददायी गोष्ट असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने सांगतात. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २ ते ९ डिसेंबर २०२१ दरम्यान रंगणार आहे. बाप लेकामधल्या तरल नात्याचा भावनिक प्रवास ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून उलगडला जाणार आहे.

कलात्मक तरीही व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांच्या फळीतलं आश्वासक नाव म्हणजे मकरंद माने. आजवर त्यांनी त्यांच्या दर्जेदार चित्रपटांतून आपले दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केले आहे. त्यामुळेच आगामी ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची प्रस्तुती असलेला आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने यांची निर्मिती असलेला ‘पोरगं मजेतय’ लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

या चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Makarand Mane (@makarandmane)

Back to top button