Baramati Crime : लग्नाची वरात थांबवल्याने जमावाकडून पोलिसांना मारहाण | पुढारी

Baramati Crime : लग्नाची वरात थांबवल्याने जमावाकडून पोलिसांना मारहाण

बारामती; पुढारी वृत्तसेवा

डॉल्बीच्या कर्कश आवाजात लग्नाच्या एक दिवस आधी रात्रीच्या वेळी काढलेल्या वरातीमुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. याची दखल घेवून ती वरात थांबविण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला जमावाकडून धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. बारामती तालुक्यातील लिमटेक येथे शुक्रवारी (दि .१९) रात्री हा प्रकार घडला. (Baramati Crime)

या घटनेत शहर पोलिस ठाण्यातील हवालदार विलास विठ्ठल मोरे हे जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी डॉल्बी चालक, ऑपरेटर यांच्यासह अन्य २३ जणांवर शासकिय कामकाजात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की यासह शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय सोनवणे, अक्षय शिंदे, रोहित शिंदे, महेश खिलारे (पूर्ण नावे नाहीत, रा. लिमटेक) यांच्यासह श्रीनाथ  ओम डिजिटल भिगवणचे मालक व ऑपरेटर व अन्य लोकांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. त्यांच्याविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱयाला मारहाणीसह, बेकायदा गर्दी जमाव जमवणे, महाराष्ट्र पोलिस कायदा, मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे यांनीच याबाबत फिर्य़ाद दिली. (Baramati Crime)

शुक्रवारी रात्री पोलीस कर्मचारी विलास मोरे हे आपली ड्यूटी बजावत होते. त्यावेळी वरिष्ठांनी त्यांना लिमटेक येथे डॉल्बी लावून वरात सुरु असल्याने वाहतुकीस अडथळा झाल्याचे वरिष्ठांनी सांगितले. त्यानंतर मोरे यांच्यासह इतर तीन सहकाऱ्यांनी घटनास्थळी जावून वरात थांबवण्याची सुचना केल्या. जिल्ह्यात सध्या कलम १४४ लागू आहे. याशिवाय डॉल्बी वाजविण्यासही बंदी असल्याची कल्पना संबंधितांना दिली. पोलिसांनी सुचना देवूनही डॉल्बी बंद केला जात नसल्याने, ते गाडीतून उतरताच १० ते १२ जणांचा जमाव त्यांच्या अंगावर आला. त्यावेळी अजय सोनवणे, अक्षय शिंदे, रोहित शिंदे, महेश खिलारे यांनी पोलीसांना शिवीगाळ सुरू करत, आमचा डीजे बंद करतो काय, याला आपण खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी दमदाटी करून मारहाण केली. यामध्ये मोरे हे जखमी झाले.

मोरे हे रस्त्यावरून खाली पडल्यानंतर अक्षय व रोहित शिंदे यांनी सरकारी वाहनाच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे काळे व शेंडगे यांनी तेथून गाडी तात्काळ बाजूला घेतली. त्यानंतर जमावातील सात ते आठ महिला मोरे यांच्या अंगावर आल्या. त्यांनीही शिविगाळ करत त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच तुम्ही दारु पिऊन आमच्या महिलांच्या गळ्यातील सोने काढून घेतल्याचा खोटा गुन्हा तुमच्यावर दाखल करू अशीही धमकी मोरे यांना देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून, काही वेळातच पोलिस निरीक्षक सुनील महाडिक हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले आणि जखमी कर्मचारी मोरे यांची विचारपूस करून उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button