Priyanka Gandhi Letter : लखीमपूर हिंसा प्रकरणी PM मोदींना पत्र, केलं ‘हे’ आवाहन | पुढारी

Priyanka Gandhi Letter : लखीमपूर हिंसा प्रकरणी PM मोदींना पत्र, केलं 'हे' आवाहन

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Letter) यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा घेरण्यचा प्रयत्न केला आहे. त्यांने पंतप्रधानांना पत्र लिहून लखीमपूर शेतकरी हत्याकांडातील (Lakhimpur violence case) पीडितांना न्याय आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. देशभरातील शेतकऱ्यांवरील खटले मागे घ्यावेत आणि सर्व शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी प्रियंका यांनी केली.

शुक्रवारी (दि. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे (three farm laws) मागे घेत असल्याची घोषणा केली. या घोषणेपासून त्यावरून राजकारण सुरू आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, मात्र त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लखीमपूर खेरी घटनेतील पीडितांना न्याय देण्याची मागणी केली आहे. लखीमपूर घटनेत केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाला संरक्षण आणि राजकीय संरक्षण दिल्याचा आरोप प्रियांका यांनी केला आहे.

गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठं यश आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर देशभरातील विरोधीपक्षांकडून, शेतकरी संघटनांकडून आणि आंदोलनाचं समर्थन करणाऱ्या नागरिकांकडून दिल्लीतील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या.

प्रियंका गांधी पंतप्रधान मोदींना तीन पानी पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी पत्रकार परिषद घेत वाचून दाखवलं. त्यांनी म्हटले की, लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी तुमच्या पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासोबत तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ नका. गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोपींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसले तर ते शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा संदेश लोकांमध्ये लोकांमध्ये जाईल. पंतप्रधानांचा हा निर्णय शहीद शेतकऱ्यांचा अपमान असेल असेही त्यांनी म्हटले.

पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली. सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात सुरू असलेले खटले मागे घ्यावेत आणि पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही प्रियंका गांधींनी केली.

Back to top button