कागल तालुक्यात विधान परिषदेची एकूण 49 मते आहेत. त्यापैकी 43 मते सतेज पाटील यांच्या पारड्यात आहेत. त्यामुळे एकूण मतांच्या 90 टक्के मते गृह राज्यमंत्री पाटील यांना मिळणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक व माजी आमदार संजय घाटगे या नेत्यांनी येथे गुरुवारी बैठकीत दिली. सतेज पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्व पाचही सदस्य महाविकास आघाडीचे आहेत. पंचायत समिती सभापतिपदही महाविकास आघाडीकडेच आहे. कागल शहरातील 23 पैकी 17 नगरसेवक महाविकास आघाडीचे आहेत. मुरगूडमध्ये सर्व म्हणजेच 20 नगरसेवक महाविकास आघाडीचे आहेत. अशा निवडणुकांमधून ज्या – ज्यावेळी कागल तालुका एखाद्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला आहे, त्या-त्या वेळी विजयाची माळ उमेदवाराच्या गळ्यातच पडलेली आहे.
खा. मंडलिक म्हणाले, आम्ही सर्वजण एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीची वज—मूठ भक्कम झाली आहे. संजय घाटगे म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पाठीशी आम्ही एकदिलाने खंबीरपणे उभे आहोत.
बैठकीस गृह राज्यमंत्री सतेज पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, 'गोकुळ'चे संचालक प्रकाश पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, अंबरिष घाटगे, मनोज फराकटे, शिल्पा खोत, शिवानी भोसले, कागलचे सभापती रमेश तोडकर, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, नगरसेवक चंद्रकांत गवळी, पक्षप्रतोद नितीन दिंडे, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, नगरसेवक बाबासाहेब नाईक, आनंदराव पसारे, सतीश घाडगे, शोभा लाड, जयश्री शेवडे, माधवी मोरबाळे, अलका मर्दाने, नूतन गाडेकर, मंगल गुरव उपस्थित होते.