Vir Das : भारतात दिवसा महिलांची पूजा आणि रात्री त्यांच्यावर गँगरेप! | पुढारी

Vir Das : भारतात दिवसा महिलांची पूजा आणि रात्री त्यांच्यावर गँगरेप!

पुढारी ऑनलाईन डेस्क

कॉमेडियन वीर दास (Vir Das) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यात त्याने केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झालाय. वीर दास याने नुकताच आपल्या युट्यूब चॅनलवरुन ६ मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीच्या जॉन एफ कैनेडी सेंटरमधील त्याच्या कार्यक्रमाचा आहे. त्याच्या या एकपात्री शोचे शिर्षक होते ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ (I come from two Indias). याचा अर्थ असा की मी दोन भारतातून आलो आहे. त्याने या व्हिडिओत भारतातील विरोधाभासावर भाष्य केले. यावरुन मोठा वाद निर्माण झालाय. वीर दास याच्या व्हिडिओवर जोरदार आक्षेप घेत त्याच्याविरोधात मुंबई तसेच दिल्लीत पोलिस तक्रारी नोंद झाल्या आहेत. दिल्लीत भाजपचे आदित्य झा यांनी तक्रार केली आहे.

वीर दासने (Vir Das) म्हटले आहे की, ‘मी एका भारतातून आलो आहे, जिथे मुले एकमेकांचा हात मास्क घालूनच पकडतात. पण नेते मास्कविना एकमेकांची गळाभेट घेतात. मी ज्या भारतातून आलो आहे, जिथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक ९ हजार आहे. तरीही आम्ही छतांवर झोपून रात्री आकाशातील तारे बघतो. मी ज्या भारतातून आलो आहे जिथे दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांचा गँगरेप होतो. मी ज्या भारतातून आलो आहे जिथे पत्रकारिता संपली आहे, पुरुष पत्रकार एकमेकांचे कौतुक करत आहेत आणि महिला पत्रकार रस्त्यावर लॅपटॉप घेऊन बसली असून ती सत्य सांगत आहे. मी ज्या भारतातून आलो आहे जिथे आमच्या घराच्या भिंतीबाहेरही आमचे खळखळून हसणे ऐकू शकता. मी ज्या भारतातून आलो आहे तिथली मोठी लोकसंख्या ३० वर्षांहून कमी वयाच्या लोकांची आहे. पण आम्ही ७५ वर्षे वयाच्या नेत्यांच्या १५० वर्ष जुन्या कल्पना ऐकणे बंद करु शकत नाही. मी ज्या भारतातून आलो आहे जिथे महिला साडीचा पेहराव करतात. तरीही त्यांना एका वृद्ध महिलेकडून सल्ला घ्यावा लागतो तिने जीवनात कधीही साडी नेसली नाही.”

या त्याच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर वीर दास याने ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. आपला उद्देश देशाला अपमानित करण्याचा नव्हता. आपला देश महान देश असल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी वीर दास यांचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, वीर दास…दोन भारत आहेत याबद्दल कोणालाही शंका नाही. एखाद्या भारतीयाने त्याबद्दल जगाला सांगावे असे आम्हाला वाटत नाही की आपण असहिष्णू आणि दांभिक आहोत.

कोण आहे वीर दास?

वीर दास याची कॉमेडियन, अभिनेता म्हणून ओळख आहे. ४२ वर्षीय वीरने स्टँडअप कॉमेडी म्हणून करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर तो हिंदी सिनेमाकडे वळला. स्टँडअप कॉमेडी शोजमधून त्याने जगभरात मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button