नगर : दोन सख्खा भावांची तुंबळ हाणामारी ! एकाने डोक्यात पाईप घातली, दुसऱ्याने थेट गोळी झाडली | पुढारी

नगर : दोन सख्खा भावांची तुंबळ हाणामारी ! एकाने डोक्यात पाईप घातली, दुसऱ्याने थेट गोळी झाडली

श्रीगोंदा (अहमदनगर); पुढारी ऑनलाईन

काष्टी येथे हॉस्पिटल समोरील वाहन बाजूला करण्याच्या कारणावरून दोन सख्खा भावांची हाणामारी झाली. या मारामारीत मनोज मुनोत यांनी डॉ. विजय मुनोत यांच्या डोक्यात पाईपने मारहाण केली. डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून मनोज मुनोत यांच्यावर गोळीबार करत जखमी केले. या गोळीबारात मनोज मुनोत यांच्या पायाला एक गोळी लागली आहे. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, मुनोत बंधूंमध्ये गेल्या काही वर्षांपासून संपत्तीचा वाद आहे.

समजलेली अधिक माहिती अशी की, मनोज मुनोत व डॉ. विजय मुनोत यांचा संपत्तीवरून वाद सुरु आहे. डॉ. विजय मुनोत यांच्या हॉस्पिटलसमोर मनोज मुनोत यांनी वाहन लावले होते. माझ्या दवाखान्यासमोर का लावले असे विचारताच दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्याचे मारामारीत  रुपांतर झाले. सुरुवातीला मनोज मुनोत यांनी डॉ. विजय मुनोत यांच्या डोक्यात पाईपने मारहाण करत जखमी केले.

त्यावर डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हर मधून गोळीबार केला. या गोळीबारात मनोज मुनोत जखमी झाले आहे. उपचारासाठी त्यांना दौंडला हलविण्यात आले आहे.

घटनास्थळास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट दिली.

Back to top button