अंकिता राऊत साकारणार ‘जीवाचं रानं’ | पुढारी

अंकिता राऊत साकारणार ‘जीवाचं रानं’

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेगवेगळ्या म्युझिक अल्बममधून आणि इन्स्टावरील रीलच्या माध्यमातून अभिनेत्री अंकिता राऊत हे नाव सर्वांना परिचित आहे. आपल्या नृत्य अदाकारीने रसिकांची मने जिंकणारी अंकिता राऊत आता ‘जीवाचं रानं’ करायला सज्ज झाली आहे. ‘जीवाचं रानं’ या म्युझिक अल्बममध्ये अभिनेता विश्वास पाटीलसोबत तिचा गावरान ठसका अनुभवता येणार आहे. गावच्या मातीचा गंध देणार हे गाणं प्रत्येकाला निखळ आनंद देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या 

संगीत विश्वात श्री अधिकारी ब्रदर्स यांच्या ‘मायबोली’ संगीत वाहिनीने आपला वेगळेपणा जपत प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ही वाहिनी आता संगीत निर्मितीमध्ये पाऊल टाकत ‘मायबोली म्युझिक’ च्या माध्यमातून संगीत निर्मितीतही आपलं दमदार स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबत प्रेक्षकांना आवडतील अशी गाणी सातत्याने देण्याचा मानस आहे. ‘जीवाचं रानं’ या अल्बमने याचा ‘श्रीगणेशा’ आम्ही केला असून संगीत क्षेत्रासाठी ‘मायबोली म्युझिक’ एक उत्तम व्यासपीठ ठरेल असा विश्वास श्री. अधिकारी ब्रदर्सचे कैलाशनाथ अधिकारी यांनी व्यक्त केला.

‘जीवाचं रानं’ अल्बमद्वारे ‘मायबोली म्युझिक’ने संगीत निर्मिती क्षेत्रात प्रस्तुतकर्ते म्हणून पहिलं पाऊल टाकलं आहे. सगळ्यांना आवडतील अशी वेगवेगळी गाणी देण्याचा मानस मायबोली म्युझिकचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर अरविंद दरवेश यांनी बोलून दाखविला.

विजय भाटे यांनी संगीत निर्मिती केली असून रोहन तुपे यांनी संगीत संयोजन केलं आहे. मनीष महाजन यांनी गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. राहुल काळे यांच्या लेखणीतून सजलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि शुभांगी केदार यांचा स्वरसाज लाभला आहे. मिक्सिंगची जबाबदारी केवल वाळंज यांनी सांभाळली आहे. अर्चित वारवडे आणि मनिष महाजन यांचं नृत्य दिग्दर्शन या गाण्याला लाभलं आहे.

Back to top button