मुंबई; पुढारी ऑनलाईन: छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणाऱ्या 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत शिवा काशिद यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. अभिनेता स्तवन शिंदे या मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारणार आहे.
शिवा काशिद हे स्वराज्याच्या इतिहासातलं महत्त्वाचं पान. शिवरायांचा हा जिगरबाज मावळा हुबेहुब शिवरायांसारखा दिसायचा असं म्हटलं जातं. महाराजांची पन्हाळ गडावरुन सुटका करण्यासाठी शिवा काशिद यांनी छत्रपती शिवरायांचं सोंग घेऊन आपल्या राजाचा जीव वाचवला होता. याच जिगरबाज शिवा काशिद यांच्या शौर्याची गाथा साकारण्यासाठी स्तवन शिंदे सज्ज झाला आहे.
'जय भवानी जय शिवाजी' मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना स्तवन शिंदे म्हणाला, 'छोट्या पडद्यावर मिळालेल्या संधीबद्दल मी खूपच आभारी आहे. 'तुमचं आमचं सेम असतं' आणि 'अग्निहोत्र २' या मालिकेत प्रेक्षकांनी मला पाहिलंच आहे. आता 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेच्या निमित्ताने पुन्हा जोडला जातोय याचा आनंद आहे.'
'शिवा काशिद यांच्या शौर्याविषयी आपण ऐकलं आहे. 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेच्या निमित्ताने ते प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे. मी या नव्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. मी लहानपणी घोडेस्वारी शिकलो आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना त्याचा नक्कीच उपयोग होईल.' अशी भावना स्तवन शिंदे याने व्यक्त केली आहे.'
तेव्हा पाहायला विसरु नका छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची गोष्ट 'जय भवानी जय शिवाजी' रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : बहुरंगी कलाकार EP 1 : अभिनयाबरोबरच प्रार्थना बेहरेची अनोखी कलाकारी