नाथाभाऊंना दिलासा : भोसरी भूखंड प्रकरणात कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर | पुढारी

नाथाभाऊंना दिलासा : भोसरी भूखंड प्रकरणात कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे. यामुळे खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भोसरी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणात काही दिवसांपूर्वी खडसे यांना कोर्टाने अटकेपासून संरक्षण प्रदान केले होते. यानंतर खडसे यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. यात एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला. त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

भोसरी येथील भूखंड प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाताई आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात गिरीश दयाराम चौधरी हे ५ जुलैपासून अटकेत आहेत, तर मंदाताईंना जामीन मिळाला आहे. याच प्रकरणात आता नाथाभाऊंनाही अंतरिम जामीन मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button