

बिग बॉस मराठी-३ च्या दुसऱ्या आठवड्याला हल्लाबोल टास्कद्वारे जोरदार सुरूवात झाली. विविध कार्यक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वांचे एकमेकाबरोबरचे मतभेद, वादविवाद आणि मैत्री प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरतेय. दरम्यान, आपल्या लाडक्या स्पर्धकाच्या मजेशीर किस्स्यांचा देखील प्रेक्षक आस्वाद घेतात. असाच एक किस्सा अक्षय वाघमारे या अभिनेत्याचा आहे. अक्षय वाघमारे हा लहानपणी खूप खोडकर होता. बिग बॉस मराठी-३ च्या घरामध्ये त्याने त्याच्या बालपणीच्या गोष्टी शेअर केल्या.
बिग बॉसच्या घरातला संयमी आणि तितकाच चतूर खेळाडू अक्षय आहे. अक्षय लहानपणी खूप खोडकर होता. त्याने स्वत: त्याच्या लहानपणीचे किस्से शेअर केले आहेत.
लहानपणी अक्षयला इतर मुलांप्रमाणे गोट्या खेळण्याचा खूप छंद होता. तो पुणे विद्यापीठ परिसरातील चाळीत राहत होता. अक्षय गोट्या खेळण्यासाठी दूरवर जायचा. एकदा मागे लागलेल्या कुत्र्यापासून वाचण्यासाठी तो पळत होता. त्यावेळी एका मोठ्या खड्ड्यात तो पडला होता.
अक्षयने आणखी एक किस्सा सांगितला. लहानपणी शाळेत तासाला बाई शिकवत असताना गुपचूप फळ्यावर लेजर लाईट मारून खोड्या काढायचा. पण, अभ्यासात तो हुशार होता. स्पोर्ट्समध्ये राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असल्यामुळे त्याच्या या खोड्या शिक्षक माफ करत असत.
असा हा अक्षय बिग बॉसच्या पटलावर टिकून राहण्यासाठी कोणते फासे टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अक्षय हा अभिनेता आहे. तो अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा जावई आहे. त्याने अरुण गवळीची मुलगी योगिताशी ८ मे रोजी लग्न केलं होतं. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. तेव्हाच लग्नाची तारीखही नक्की करण्यात आली होती. २९ मार्च २०२० मध्ये हे लग्न होणार होतं. मात्र अचानक आलेल्या लॉकडाउनमुळे लग्न पुढे ढकललं. अखेर ८ मे २०२० रोजी दोघं लग्नाच्या बेडीत अडकले.
अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अनेक अडचणींच्या काळात अक्षय आणि योगिताने एकमेकांना आधार दिला होता.
अक्षयने फत्तेशिकस्त, बस स्टॉप, दोस्तीगिरी, बेधडक यासारख्या चित्रपटात काम केलं आहे.