आर्यन खान : हे कसले आदर्श? | पुढारी

आर्यन खान : हे कसले आदर्श?

तीन-चार दिवसांपूर्वी मुंबईच्या समुद्रकिनारी एका आलिशान जहाजावर पडलेला छापा आणि त्यात अमली पदार्थ बाळगल्या प्रकणात सापडलेली अतिश्रीमंतांची मुले हा सारा विषय नवा नसला, तरी चक्रावून सोडणारा नक्‍कीच आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला आरोपावरून अटक झाली आहे. तो एकटाच नाही, तर त्याच्या सोबतच आणखी डझनभर तरी अशीच अतिशय श्रीमंत घरातली मुलेही एनसीबीच्या जाळ्यात सापडली. खरे तर, समाजात उजळमाथ्याने वावरणार्‍या त्याच मुलांच्या पालकांना, जन्मदात्यांना आपल्या मुलांच्या असल्या वर्तनाची शरम वाटली पाहिजे. प्रामुख्याने काश्मीरच्या कथुआ येथील एका बालिकेवरील बलात्कार हत्येनंतर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री आपल्याला भारतीय असल्याची शरम वाटते म्हणून सोशल मीडियात फलक झळकवित होत्या. त्यापैकी कोणा एकीलाही आज आर्यन खान याच्या अटकेसाठी शरम वाटली नाही काय? त्यापैकी कोणी किंवा अन्य नामवंत चित्रपट अभिनेता व्यावसायिक जनतेसमोर येऊन या अटकेविषयी साधी दिलगिरी व्यक्‍त करताना दिसलेला आहे काय? गतवर्षी सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर माध्यमांत जे वादळ उठलेे, तेव्हा एकूणच बॉलीवूड आणि चित्रपट व्यवसाय झाकोळून गेला होता. अनेक अभिनेत्री व अभिनेते यांची चौकशी झाली. यामागचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न झाला, तर त्या यंत्रणेलाच राजकीय रंग चढवून आपली पापे झाकण्यासाठी अनेक नामवंत पुढे सरसावलेले होते. आज त्याच अमली पदार्थ सेवनाच्या मालिकेतील अटक आर्यन खानपर्यंत पोहोचली आहे. आता मात्र या सर्व नामवंतांची वाचा बसली आहे. उलट त्यांनी आपल्या बेशर्मीचे प्रदर्शन मांडलेले आहे. त्यापैकी काही आरोपी मुलांचे पालक एनसीबीच्या कार्यालयात येऊन धडकले. आपल्या मुलांना बर्गर खायची सवय असल्याने त्यांनी ते खाद्यपदार्थ अगत्याने सोबत आणलेले होते. मुलांचे कोठडीत हाल होऊ नयेत, याची त्यांना चिंता होती आणि त्यात शाहरूखची पत्नी, आर्यनची आई गौरी खान हिचाही समावेश होता. मुलाविषयीचे अगत्य समजू शकते; पण आपले मूल असे भरकटल्याची वेदना त्यात कुठेही नसावी, ही आजकालच्या श्रीमंतीची वा प्रतिष्ठेची जणू खूण झालेली आहे. मुद्दा त्यापेक्षा मोठा असा आहे की, सामान्य मध्यमवर्गीय वा सुखवस्तू वर्गातली मुले अशा प्रतिष्ठितांच्या मुलांना आपले आदर्श मानून वाटचाल करायला बघत असतात. असले आदर्श किंवा आयडॉल समाजाला कुठे घेऊन जाणार आहेत, त्याचाही थांगपत्ता नसलेल्यांना आपण समाजधुरीण समजतो आणि राजकारणापासून अन्य क्षेत्रांतील मान्यवर त्यांच्या पाठराखणीला पुढे येतच असतात.

या पार्श्‍वभूमीवर सुनील दत्त हा अभिनेता व राजकारणी आठवतो. त्यांनी चित्रपट क्षेत्र अभिनयाने गाजवलेले होतेच; पण समाजात आपली प्रतिष्ठा निर्माण केल्यावर तिची जीवापाड जपणूक करण्यालाही प्राधान्य दिलेले होते. कारण, सुनील दत्त यांचाच पुत्र संजय दत्तसुद्धा अशाच अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेला होता. त्याचे समर्थन त्या पित्याने केलेले नव्हते. त्याला सर्व कायदेशीर वा वकिलांची मदत सुनील दत्त यांनी केली; पण त्याच्या असल्या दुर्वर्तनाचे कुठे समर्थन केलेले नव्हते. फार कशाला त्यानंतर सुनील दत्त यांनी सार्वजनिक जीवनातून अंग काढून घेतलेे. मुंबईतून लोकसभेची निवडणूक लागोपाठ जिंकणार्‍या दत्त यांनी पुढल्या निदान दोन निवडणुका तरी लढवलेल्या नव्हत्या. त्याच नशापानाच्या आहारी जाऊन संजय दत्त बॉम्बस्फोट मालिकेतला आरोपी ठरला आणि रितसर शिक्षाही भोगून आलेला आहे. त्याला संधी मिळेल तिथे व आवश्यक तिथे त्याने लपवाछपवी न करता आपल्या गुन्ह्याची जाहीर कबुली दिलेली आहे. अन्यायाचा कांगावा केलेला नाही वा झाकपाक केली नाही. त्या पिता-पुत्रांनी आदर्श उभा केला, असे किमान म्हणता येईल. सुनील दत्त आज हयात नाहीत; पण शाहरूखचे मौन बघितल्यावर त्या पित्याचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. तितकीच आठवण फिरोज खान या अभिनेत्याची होते. दहा-बारा वर्षांपूर्वी कधीतरी फिरोज खानचा अभिनेता पुत्र फरदीन खान याच्यावरही अमली पदार्थ सेवनाचा आरोप झाला होता. त्याच्याकडेही नगण्य प्रमाणात अमली पदार्थ मिळालेे होते आणि त्यालाही अटक झालेली होती. त्यावेळी पिता फिरोज खान तोंड लपवून बिळात दडी मारून बसला नव्हता. माध्यमांच्या समोर येऊन त्याने आपल्या पुत्राकडून गुन्हा झाला असेल, तर त्यालाही शिक्षा झालीच पाहिजे, असे ठामपणे सांगितले होते. मुलाचा बाप म्हणून त्याला सर्वप्रकारची कायदेशीर मदत करू; पण त्याच्या वर्तनावर पांघरूण घालणार नाही, असे त्याने प्रामाणिकपणे सांगितले होते. तुलनेने फिरोज खान कोणी मोठा लोकप्रिय अभिनेता नव्हता; पण त्याच्या प्रामाणिक भूमिकेचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना, त्याच स्मरणामुळे आजच्या झगमगत्या बॉलीवूड वा चित्रपट व्यवसायातील प्रतिष्ठा किती पोखरली गेली आहे, त्याची प्रकर्षाने जाणीव होते. केवळ ‘बच्चे हैं’ म्हणून या दिवट्यांच्या कुकर्माकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्रीमंतांची चैन समजून डोळेझाकही करता येणार नाही. कुठली दंगल, हिंसाचार अथवा सामाजिक स्वरूपाच्या विषयात सामाजिक जबाबदारी म्हणून राजकारण्यांवर दुगाण्या झाडायला उत्साहात पुढे सरसावणार्‍या तथाकथित कलावंत, सृजनशील मान्यवरांचे मुखवटे मग गळून पडतात. पायाशी काय जळते आहे, त्याचे भान नसलेले लोक जेव्हा इतक्या उजळमाथ्याने कांगावखोरी करून समाजाचे आदर्श बनतात तेव्हा एकूण समाजाची अधोगती वेगाने चालू असल्याचे खुशाल समजावे, इतकाच या घटनाक्रमाचा अर्थ होऊ शकतो.

Back to top button