जितेंद्र आव्हाड यांनी प्रियांका गांधींना उद्देशून लिहिली पोस्ट

जितेंद्र आव्हाड यांनी प्रियांका गांधींना उद्देशून लिहिली पोस्ट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखीमपूर-खेरी हिंसाचार प्रकरणावर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेते यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान  इंदिरा गांधी यांच्यासंदर्भातील एक आठवण शेअर करत काॅंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना उद्देशून म्हणाले की, "इंदिरा गांधींची नात प्रियांका गांधी लखीमपूर-खेरी प्रकरणाला कसे वळण देते पाहूयात."

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्‍या फेसबुक पेजवरून इंदिरा गांधी यांच्या जीवनातील एक आठवण शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, "लखीमपूर-खेरीच्या हत्याकांडानंतर तिथे गेलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना बघून एक आठवण लिहावीशी वाटली. १९७७ साली पाटणापासून काही अंतरावर असलेल्या बेलछी गावामध्ये १४ दलितांची अमानूषपणे हत्या करण्यात आली हाेती."

"याचे राजकीय महत्त्‍व ओळखून इंदिरा गांधींनी बेलछीला जायचे ठरवले. त्या ट्रेनने पाटणाला पोहचल्या. तिथून एका जीपमध्ये बसल्या.पुढे गेल्या तर त्यांची जीप चिखलात रुतली. पुढचा मार्ग काढण्यासाठी म्हणून ट्रॅक्टर आणण्यात आला; परंतु रस्त्यावर असलेला प्रचंड चिखल आणि त्यामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा यामुळे ट्रॅक्टरही पुढे जाईनासा झाला."

"तेवढ्यात त्यांच्यासोबत असलेल्या त्या गावातील एका कार्यकर्त्याने सांगितले की, गावामध्ये एक हत्ती आहे. त्या हत्तीचे नाव मोती. आणि त्या हत्तीवर बसून आपण हा परिसर पार करू शकतो. इंदिरा गांधींनी पुढे त्याला होकार दिला. तिथे उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला की, तुम्ही जाणार कशा? हत्तीवर बसणार कशा? त्यांनी उत्तर दिले 'बहोत दिनों के बाद हाथी कि सवारी करने मिलने वाली है' हत्तीला आणण्यात आले. इंदिरा गांधी हत्तीवर बसल्या."

"हत्ती कसा चालतो हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे बसलेल्या माणसाला तोल सांभाळणे खूप कठीण असतं. त्या मार्गावर प्रचंड वादळी वारा सुटला होता. हत्तीला नदी पार करुन पुढे जायचे होते. कोणीही हिम्मत दाखवली नसती. पण, आता मागे हटायचे नाही या ईर्षेने पेटलेल्या इंदिराजींनी प्रवास तसाच सुरु ठेवला. साडेतीन तास हत्तीवर बसून प्रवास करत त्या बेलछीला पोहचल्या आणि इतिहासाची पाने पलटली."

"इंदिरा गांधी जेव्हा बेलछीला पोहचल्या, तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक गावातील दलित त्यांच्या स्वागतासाठी उभा होता. तिथल्या दलितांना वाटले की, कोणीतरी देवदूतच आला आहे आपल्याला भेटायला. आणि तिथूनच इंदिरा गांधींचा पुर्नजन्म झाला. तो एवढ्या लवकर होईल, असे कोणाला अपेक्षितही नव्हतं. कारण १९७७ च्या निवडणुकीत त्यांची पूर्णपणे धूळधाण झाली होती. परंतु राजकारण कधी काय वळण घेईल हे कोणालाच माहीत नसते. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असं म्हणतात. इंदिरा गांधींनाही असेच शहा कमिशन, वेगवेगळ्या ठिकाणी जेलमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, या सगळ्यांतून त्या धीरोदत्तपणेने बाहेर पडल्या. अन् अखेरीस १९८० साली जनता पक्षाची धूळधाण झाली आणि इंदिरा गांधी सत्तेत आल्या. बघुयात इंदिरा गांधींची नात प्रियांका गांधी लखीमपूर-खेरीला कसे वळण देते", अशी आठवण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरून शेअर केली आहे.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय आहे?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news