पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य चित्रपटांना शह देण्यासाठी बॉलीवूडची मंडळी सध्या जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. पण त्यात त्यांना फारसे यश मिळेल, असे दिसत नाही. कारण, मसालापटाच्या नावाने हल्ली बॉलीवूडचे दिग्दर्शक जे काही सादर करत आहे ते पाहून आपण हा चित्रपट का पाहायला आलो, असे वाटण्याची शक्यताच अधिक. (Cirkus Super Flop) रोहित शेट्टी हा बॉलीवूडचा तगडा दिग्दर्शक. बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर हिट देणाऱ्या या दिग्दर्शकाचा 'सर्कस' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, ही सर्कस पाहण्यासाठी थिएटरमध्ये फारशी गर्दीच झालेली नाही. 'करंट लगा रे..' हे दीपिका आणि रणवीर सिंगचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नव्हता. एक आगळीवेगळी मेजवानी आपल्याला थिटएरमध्ये मिळणार असल्याचा त्यांचा आनंद फार वेळ टिकला नाही. कॉमेडीच्या नावाखाली ओढून ताणून केलेला विनोद, अचकट- विचकट हावभाव, जोडीला कानठळ्या बसविणारे संगीत यामुळे ही 'सर्कस' सपशेल आपटली आहे. (Cirkus Super Flop)
रणवीर सिंह (Ranveer Singh), पूजा हेगडे (Pooja Hegde) आणि जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) स्टारर चित्रपट 'सर्कस (Cirkus)' बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. रोहित शेट्टींचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी सुपर फ्लॉप ठरवलं आहे. एका युजरने ट्विटरवर म्हटलं आहे की, चित्रपटाच्या मध्यांतरावेळी समजलं की, अख्ख्य़ा चित्रपटगृहात आम्ही पती-पत्नी दोघेच आहोत. त्यांनी मोकळ्या चित्रपटगृहाचा फोटोदेखील ट्विट केला. 'सर्कस' रिलीजनंतर ट्विटरवर लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. ट्विटरवरून काही लोक आपले तिकिटाचे पैसेदेखील परत मागत आहेत.