पुढारी ऑनलाईन डेस्क : नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची- मला हो म्हणतात लवंगी मिरची, कसं काय पाटील बरं हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का, फड सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागल कोल्हा, खेळताना रंग बाई होळीचा, सोळावं वरीस धोक्याचं, पाडाला पिकला आंबा, अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या आणि पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा -आई मला नेसव शालू नवा अशी शेकडो कर्णमधूर गीते गाणाऱ्या लोकप्रिय गायिका सुलोचना चव्हाण यांनी आज ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लावणीसम्राज्ञी अशी त्यांची ख्याती. तुम्हाला माहितीये का, लावणीसम्राज्ञी ही उपाधी सुलोचना यांना कुणी दिली?
मराठी चित्रपटात संगीतकार वसंत देसाई यांनी त्यांना गाण्याची पहिली संधी दिली होती. मराठी साहित्यकार आचार्य अत्रे (प्रल्हाद केशव अत्रे) यांचा "हीच माझी लक्ष्मी" हा चित्रपट होता. या चित्रपटासाठी त्यांनी गायन केलं. स्वत: अत्रे यांनी या गाण्याची रचना केली होती. अभिनेत्री हंसा वाडकर यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं. अत्र्यांना गाणं पार आवडलं. आणि त्यांनी सुलोचना चव्हाण यांना "लावणी सम्राज्ञी" पदवी दिली.
१९५२ साली आचार्यांनी लावणी सम्राज्ञी ही पदवी सुलोचना यांना दिली होती. या उपाधी प्रमाणे त्यांनी लावणी गायन क्षेत्रात रसिकांच्या मनावर गारुढ घातलं होतं.
सुलोचना यांनी सुरुवातीला मराठी भावगीत गायला सुरुवात केली. 'सख्या हरी जडली प्रीत तुझ्यावरी' असे गीताचे बोल होते. सुलोचना चव्हाण यांनी मराठीशिवाय तमिळ, गुजराती, भोजपुरीत गायलं होतं.
सुलोचना या कोल्हापूरचे शामराव दौलत चव्हाण यांच्याशी १२ ऑगस्ट १९५३ रोजी विवाहबद्ध झाल्या. जगदीश खेबुडकरांनी 'रंगल्या रात्री अशा' चित्रपटासाठी 'नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची' हे गाणं लिहिल होतं. सुलोचना यांनी आपल्या खर्ज्या आवाजात ती गायली आणि हे गाणं अद्यापही बहारदार म्हणून ओळखलं जातं.