चाकण : शेतात आढळला महिलेचा सांगाडा | पुढारी

चाकण : शेतात आढळला महिलेचा सांगाडा

चाकण : पाकण- रोहकल रस्त्यावर मार्तंड पार्कशेजारी असलेल्या शेतात एका महिलेचा अस्थिपंजर सांगाडा आढळून आला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) उघडकीस आली. दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा सांगाडा घटनास्थळी पंचनामा करून ताब्यात घेतला आहे. सांगाड्याजवळील कपड्यांवरून संबंधित सांगाडा महिलेचा असावा, असा पोलिसांचा कयास आहे. घटनास्थळी पोलिसांना एक गाऊन मिळून आला आहे.

चाकण ते बिरदवडी दरम्यानच्या मार्तंड पार्कच्या जवळील सुमारे 12 एकराच्या जमीन गट नंबर 2034 मध्ये हा सांगाडा मिळाला आहे. शुक्रवारी या शेतात ऊसतोड मजूर कामासाठी आले होते, त्यावेळी त्यांना हा सांगाडा दिसला. त्यांनी याबाबत शेताच्या मालकाला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. या सांगाड्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

 

Back to top button