लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन | पुढारी

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक चित्रपटांमधून आपल्या गायनाने वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मुंबईत गिरगावातील फणसवाडी येथे राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

याचवर्षी कला क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च, १९३३ रोजी झाला होता. प्रसिद्ध मराठी लावणी सम्राज्ञी म्हणून त्यांची ख्याती होती. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’, ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यासारख्या एकांहून एक ठसकेबाज लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजात सुरेलबद्ध केल्या होत्या. वयाच्या ९ व्या वर्षी त्यांनी पहिलं गाणं गायलं होतं.

त्यांना लता मंगेशकर पुरस्काराने (२०१०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१२) ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी ‘रंगल्या रात्री’ चित्रपटासाठी पहिली लावणी गायली होती.

त्यांच्या प्रसिद्ध लावण्या-

  • तुझ्या उसाला लागल कोल्हा
  • पदरावती जरतारिचा
  • सोळावं वरिस धोक्याचं
  • कसं काय पाटील बरं हाय का?

सुलोचना चव्हाण यांनी हिंदी चित्रपटासाठी अल्बम गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या प्रसिद्ध हिंदी गाण्यांमध्ये ‘छोरी चोरी आग सी दिल में लगाके’, ‘उल्फत जिसे कहते हैं, जीने का सहारा है’, ‘मौसम आया है रंगें’, ‘वो आए हैं’ समाविष्ट आहेत.

जवळपास ७० चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत.

 

Back to top button