राज यांचा अयोध्या दौरा रोखणाऱ्या बृजभूषण सिंह यांचे मनसे स्वागत ? | पुढारी

राज यांचा अयोध्या दौरा रोखणाऱ्या बृजभूषण सिंह यांचे मनसे स्वागत ?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा उधळून लावणारे उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याचे स्वागत करण्याचे संकेतच मनसेने दिले आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद मिटल्यानंतर बृजभूषण यांचा पुणे दौरा जाहीर झाला. त्यानंतर त्यांच्या महाराष्ट्र येण्याबद्दल कोणीही बोलू नये, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवत राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. त्यासाठी १० जूनचा मुहूर्तही निश्चित करण्यात आला होता. मात्र, राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी भूमिका घेत खा. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौन्याला कडाडून विरोध केला होता. यासाठी ठिकठिकाण दौरे, भेटी देत वातावरण निर्मितीही केली होती. त्यामुळे राज यांनी हा आपलाच दौराच रद्द करावा लागला होता. राज ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा उधळून लावणारे बृजभूषण सिंह आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने येत्या १५ जानेवारीला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

राज ठाकरेंना अयोध्येत येण्याप सून रोखणाऱ्या बृजभूषण यांना मनसे महाराष्ट्रात विरोध करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, मनसे बृजभूषण यांना कोणताही विरोध करणार नाही, असे पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, वसंत मोरे यांनी राजकारणात कुणीही शत्रू नसतो. तसेच नियम कुस्तीतही आहेत. स्पर्धेत हार- जीत झाल्यावरही पैलवान एकमेकांची गळाभेट घेत असतात. त्याप्रमाणे सिंह यांचे स्वागत करू, असे विधान केले. मात्र, वसंत मोरे सध्या पक्षापासून दुरावत असल्याने त्यांच्या विधानाबद्दल उलटसुलट चर्चा रंगली होती, तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बृजभूषण यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना
लक्ष्य केले.

वाघाची शिकार करण्यासाठी शेळीचा वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे बृजभूषण सिंह ही शरद पवारांनी बांधलेली शेळी असल्याची टीका देशपांडे यांनी केली होती. त्यामुळे सिंह यांना मनसे विरोध करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

Back to top button