Subhedar Movie : ‘पावनखिंड’नंतर मराठी सिनेपटलावर अवतरणार ‘सुभेदार’ | पुढारी

Subhedar Movie : 'पावनखिंड'नंतर मराठी सिनेपटलावर अवतरणार 'सुभेदार'

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही वर्षांपासून मराठी सिनेपटलावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्यगाथांचा (Subhedar Movie) देदीप्यमान जागर सुरू आहे. वर्तमानकाळात रसिकांना शिवकालीन इतिहासाच्या क्षणांचे साक्षीदार बनवण्याच्या या वाटेवर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता-निर्माता दिग्पाल लांजेकरचे मोलाचे योगदान आहे. दिग्पालने दिग्दर्शित केलेल्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या शिवराज अष्टकातील चार यशस्वी चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत राष्ट्रीय पातळीवरील रसिकांचेही लक्ष वेधून घेतलं आहे. ‘शेर शिवराज’ नंतर दिग्पाल लांजेकर शिवकालीन इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला कोणता अध्याय घेऊन येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. दिग्पालने शिवराज अष्टकातील पाचव्या चित्रपटाची घोषणा केल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Subhedar Movie)

दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतील ‘शिवराज अष्टक’ या शिवचरित्रावरील चित्रपट श्रुखंलेला तमाम शिवभक्त आणि रसिकांमध्ये खूपच लोकप्रियता मिळाली. त्यामुळे दिग्पालच्या आगामी चित्रपटात काय पहायला मिळणार? याबाबत सर्वांनाच कुतूहल होतं. नुकतीच ‘सुभेदार’ या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. ‘काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा. ‘सुभेदार’ अशी या चित्रपटाची अतिशय समर्पक टॅगलाईन आहे.

‘सुभेदार’ या शीर्षकावरून हा चित्रपट सुभेदार तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा असल्याचं समजतं. त्यानुसार या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारून किल्ले कोंढाण्याच्या शिखरावर स्वराज्याचं विजयी तोरण बांधण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका बलाढ्य योद्ध्याचा रोमहर्षक पराक्रम ‘सुभेदार’मध्ये अनुभवायला मिळेल.

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करणार आहेत. प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायण वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशिद जावळकर, शिवभक्त अनिकेत निशिद जावळकर, श्रुती दौंड या चित्रपटाचे निर्माते आहेत.

जून २०२३ मध्ये ‘सुभेदार’ चित्रपट रसिक दरबारी सादर होणार आहे.

Back to top button