पारनेर : ‘जलजीवन’ श्रेयाची लंके समर्थकांकडून पोलखोल ! मविआचीच प्रशासकीय मंजुरी | पुढारी

पारनेर : ‘जलजीवन’ श्रेयाची लंके समर्थकांकडून पोलखोल ! मविआचीच प्रशासकीय मंजुरी

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  पारनेर तालुक्यातील विविध गावांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या योजनांचा सन 2021 मध्येच आराखड्यात समावेश करण्यात आला असून महाविकास अघाडीचे सरकार सत्तेवर असतानाच या योजनांना प्रशासकिय मान्यताही मिळाली असल्याचे आमदार नीलेश लंके समर्थक व बहुतांश लाभार्थी गावांच्या सरपंचांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या कामांसाठी आमदार लंके यांनीच पाठपुरवा केला. या कामांचे श्रेय केवळ आ. लंके यांनाच आहे. खासदार सुजय विखे अथवा तालुक्यातील भाजपा पदाधिकार्‍यांचा त्याच्याशी काहीही सबंध नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. 166 कोटींच्या कामांना प्रशासकिय मंजुरी मिळालेली आहे, तर 134 कोटींच्या योजना प्रस्तावित आहेत.

24 ऑक्टोबर 2021 रोजी तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत पारनेर तालुक्यातील 93 गावांचा आराखड्यात समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येण्यापूर्वीच या योजनांना प्रशासकिय मान्यता मिळालेली आहे. टाकळी ढोकेश्वरच्या सरपंच अरुणा खिलारी, मांडवे खुर्दचे सरपंच सोमनाथ आहेर, पिंपरी पठारचे उपसरपंच अनिल शिंदे, तिखोलच्या रोहिणी ठाणगे, म्हसोबा झाप प्रकाश गाजरे, पळसपूर सुवर्णा आहेर, काताळवेेढे पियुष गाजरे, सावरगाव वैशाली चिकणे, नांदूरपठार चित्रा घोलप, कारेगाव बापू ठुबे यांच्यासह योजना मंजूर असलेल्या सर्व गावांचे सरपंच व प्रमुख कार्यकर्त्यांनी या योजनेचे श्रेय केवळ आमदार लंके यांनाच असल्याचे ठामपणे सांगितले.

100 नव्हे, 166 कोटी
जल जीवन मिशन योजनेची 100 कोटी रुपयांची कामे खासदार विखे यांनी मंजूर केल्याचे तालुक्यातील भाजपा पुढारी सांगत आहेत. प्रत्यक्षात या कामांसाठी 165 कोटी 82 लाख 74 हजार 732 रुपये मंजूर झाल्याचा दावा लंके समर्थक सरपंचांनी केला आहे.

आता साक्षत्कार कसा
खडकवाडी ते वासुंदे रस्ता बजेटमध्ये 1 मार्च 2021 रोजी मंजूर झालेला आहे. असे असतानाही तालुक्यातील भाजपाचे पुढारी हा रस्ता विद्यामान पालकमंत्र्यांनी मंजूर केल्याचा दावा करीत असल्याचे सांगत लंके समर्थक सरपंचांनी मंजुरीचा आदेशच माध्यमांपुढे सादर केला.

प्रस्तावित कामे व गावे
मंजूर गावांव्यतीरिक्त पानेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा, देसवडे, देवीभोयरे, धोत्रे बुद्रुक, धोत्रे खुर्द, हिवरे कोरडा, पाडळी कान्हूर, माळकूप, गोरेगाव, लोणीमावळा, रुईछत्रपती, वाळवणे, रायतळे, पिंपरीगवळी, सावरगांव, वडझिरे, शेरीकोलदरा, वासुंंदे, राळेगणसिध्दी, शिरापूर, माजमपूर, हकीगतपूर, बाभुळवाडे, खडकवाडी, तास, वनकुटे, निघोज, मोरवाडी, ढवनवाडी, शिरसुले, वडगांव गुंड, जवळा, काताळवेढे, डोंगरवाडी, पळवे बुद्रुक व खुर्द या गावांमध्येही पाणी योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी 133 कोटी 67 लाख 52 हजार खर्च अपेक्षित आहे, हे कागदपत्रांच्या पुराव्यासह सांगण्यात आले. या कामांनाही लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

परिवाराला कधी देवदर्शनाला नेले का?
कोरोना सेंटरला कीती निधी मिळाला, मोहटादेवी दर्शनाचा खर्च कोणी केला, हे विचारणार्‍यांनी कोरोनात किती रुग्णांना मदत केली? रेमडेसीवीरसाठी किती पैसे उकळले, हे तालुक्याला माहित आहे. आपण आपल्या परिवाराला कधी देवदर्शनाला नेले का? जनतेला देवदर्शन होत असताना तुमची पोटदुखी का? असा सवाल राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे, तालुकाध्यक्ष पूनम मुंगसे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे यांनी केला.

 

प्रतिष्ठानचे सहकारी, दानशूर व्यक्तींंच्या मदतीतून मोहटादेवी दर्शन यात्रा सन 2016 पासून राबविण्यात येत आहे. आमचा दुसर्‍यांच्या पाकिटांवर डोळा नसतो. पाकिटमारांनी हे ध्यानात घ्यावे.
                                                 – राजेंद्र चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य

 

शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरास अनुदान मिळावे, यासाठी कोणताही प्रस्ताव पाठविलेला नाही. टीका करणार्‍यांनी अभ्यासपूर्ण माहिती घेऊनच टीका करावी अथवा कोविड रुग्णांची माफी मागावी. गावोगावचे सहकारी, दानशूर व्यक्ती, देश, परदेशातून आलेल्या मदतीतून हे सेंटर चालविण्यात आले.
                                            – सुदाम पवार अध्यक्ष, नीलेश लंके प्रतिष्ठान

Back to top button