नागपूर पोलिसांचे ऑपरेशन नार्को फ्लॅश आउट अभियान सुरू; अमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार | पुढारी

नागपूर पोलिसांचे ऑपरेशन नार्को फ्लॅश आउट अभियान सुरू; अमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार

नागपुर; पुढारी वृत्तसेवा: नागपूर पोलिसांच्या वतीने ऑपरेशन नार्को फ्लॅश आउट हे अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या अभियानांतर्गत नार्कोटिक्स प्रकरणातील अमली पदार्थांची विक्री आणि त्याचे वितरण करण्याऱ्यांवर आणि यापूर्वी पोलिसांच्या कारवाईत आढळलेल्या लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

नागपूर शहरात यापूर्वी ११०० च्या जवळपास लोकांचा गेल्या काही वर्षात अमली पदार्थ विक्री आणि वितरण प्रकरणात सहभाग आढळला होता. यापैकी जवळपास ११० लोकांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. हे ११०० लोक सध्या अमली पदार्थाच्या व्यवसायाशी निगडित आहेत. त्यांनी हा व्यवसाय सोडला की नाही, याची चौकशी सध्या पोलीस करणार आहेत. याशिवाय पोलिसांनी एका व्हॉट्सअप नंबरवर अमली पदार्थासंदर्भात कुठलीही माहिती समजल्यास ती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

शहरातील हुक्का पार्लर, धाबे किंवा कॉफी शॉपमध्ये कुठल्याही पद्धतीने लपून-छपून जर अमली पदार्थाची विक्री किंवा सेवन होत असल्यास नागरिकांनी त्याची तक्रार या व्हॉट्सअप नंबर वर करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. फार्मसीमधून काही औषधांचे अति प्रमाणात सेवन करून, नशा करण्याचे प्रकारही काही नागरिक करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मेडिकल शॉप्समधूनही ज्या औषधात जास्त प्रमाणात नशा आहे, ती औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि प्रिस्क्रिप्शननुसारच देण्यात यावे असेही आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहेत. असे न केल्यास फार्मसी स्टोअर्सवर कारवाई करण्यात येईल; असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

नागपूर पोलिसांनी यापूर्वीही अनेकवेळा सर्च ऑपरेशन करीत, वेगवेगळ्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना अटक केली आहे. शहरातील अवैध हुक्का पार्लर चालविणाऱ्या विरोधात कारवाई केली. तर क्रीकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांवरही धडक कारवाई केली होती. मध्यंतरी सेंट्रल जेलमधून चालणाऱ्या मोबाईल रॅकेटवरही कारवाई करण्यात आली होती.

Back to top button