गोवा : राजकीय घडामोडींना पुन्हा वेग; मुख्यमंत्री दिल्लीत; मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेला ऊत | पुढारी

गोवा : राजकीय घडामोडींना पुन्हा वेग; मुख्यमंत्री दिल्लीत; मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चेला ऊत

पणजी; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजप प्रवेश केल्यानंतर दोन आठवड्यांनी राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे मंगळवारी दुपारी अचानकपणे दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांनी मंगळवारी सकाळी जुने गोवे येथे कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर दिवसभर त्यांचे विविध कार्यक्रम होते. मात्र नियोजित कार्यक्रम रद्द करून मुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले. पुढील दोन दिवस ते दिल्लीत असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पर्यटन खात्याला मिळालेले पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंत्री रोहन खंवटे एक दिवसआधीच दिल्लीत पोहोचले आहेत. काँग्रेस आमदारांच्या घाऊक पक्षांतरानंतर त्यातील काहींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याच्या आणि काही मंत्र्यांची खाती कमी केली जाण्याची जोरदार चर्चा होती. त्यावेळी तसे कोणतेही बदल करण्यात आले नसले तरी दोन आठवड्यांनी या चर्चेला पुन्हा ऊत आला आहे.

दुसरीकडे खासदार लुईझीन फालेरो यांच्या पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला अपयश आल्यावर पक्षाने राष्ट्रीय तसेच राज्य कार्यकारिणी बरखास्त करत फालेरो यांना पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून कमी केले होते. त्यानंतर राज्याच्या नव्या समितीमध्येही त्यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे फालेरो पुन्हा काँग्रेसची दारे ठोठावत आहेत. मात्र, याला पक्षातील अन्य नेत्यांनी विरोध केला आहे. दुसरीकडे गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबतही घडामोडी सुरू आहेत. काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी युरी आलेमाव यांची नियुक्ती करण्यात आल्यावर आमदार कार्लोस फेरेरा यांनी विजय सरदेसाई यांना गोवा फॉरवर्ड काँग्रेसमध्ये विलीन करावा, असे आवाहन केले होते. त्याला विजय यांनी तसा प्रस्ताव आल्यास विचार करू असे उत्तर दिले होते. या सर्व घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.

Back to top button