

सांगली; पुढारी वृत्तसेवा : नगररचना विभागाकडील दहा लाख रुपयांच्या लाचप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि. द. बर्वे यांनी केली आहे.
बर्वे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेत लाचखोरीची प्रकरणे सतत घडत आहेत. सांगलीतील एका ज्येष्ठ वकिलाने नगररचना विभागावर लाचखोरीची तक्रार केली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागातील कर्मचार्यांनी दहा लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी साडे सात लाख रुपयाची रक्कम एजंटामार्फत स्वीकारली असल्याची तक्रार आहे.
त्याबाबत चौकशी करावी. संबंधित वकिलांनी लाच देऊन आपले काम व्हावे यासाठी प्रयत्न केलेले आहेत. याचा अर्थ त्यांना आपले काम लाच देऊन करून घ्यायचे होते हे सिद्ध होते. लाच देणारे आणि घेणारे दोघेही दोषी असतात. याप्रकरणी निवृत्त न्यायाधीशामार्फत सखोल चौकशी करावी. महापालिकेतील इतर विभागातील कर्मचारी मध्यस्थ म्हणून काम करतात. त्याचाही आपण सखोल अभ्यास करावा व कोणाचाही मुलाहिजा न ठेवता दोषींवर कडक कारवाई करावी.