चाकण : वडिलांच्या टेम्पोखाली चिरडून बालक ठार

चाकण : वडिलांच्या टेम्पोखाली चिरडून बालक ठार

चाकण : पुढारी वृत्तसेवा : वडील मालवाहू टेम्पो रिव्हर्स घेत असताना त्यांचा चार वर्षांचा चिमुरडा मुलगा मागून धावत आला आणि टेम्पोच्या मागील चाकाखाली चिरडून ठार झाला. सदरचा हृदयद्रावक अपघात चाकणजवळील मेदनकरवाडी फाटा ते चक्रेश्वर रस्त्यावर मंगळवारी (दि. 27) दुपारी एकच्या सुमारास घडला. अतुल इंदल निषाद (वय 4, रा. मेदनकरवाडी फाटा, चाकण) असे या अपघातात ठार झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.

मंगळवारी सायंकाळी चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर या बालकाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, इंदल निषाद हे टेम्पो (एमएच 16 एई 2543) घराजवळून काढून जात होते. टेम्पो मागे घेत असताना त्यांचाच चिमुरडा अतुल टेम्पोच्या मागून धावत आला व टेम्पोच्या चाकाखाली चिरडला गेला. त्याला लगेचच रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने इंदल कुटुंब हादरून गेले असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news