फनरल आजपासून चित्रपटगृहात | पुढारी

फनरल आजपासून चित्रपटगृहात

पुढारी ऑनलाईन डेस्क : असं म्हणतात… आयुष्यात दोनच दिवस महत्वाचे असतात आपण जन्मतो तो दिवस आणि ज्या दिवशी आपल्या जगण्याचा अर्थ कळतो तो दिवस! अगदी छोट्या, साध्या, नैसर्गिक गोष्टींमधे, अनुभवांमध्ये ही आनंदाच्या अनेक छटा लपलेल्या असतात. त्यांचा शोध घेणं, त्यातली गंमत अनुभवणं यातच आपल्या जगण्याचा सारा अर्थ सामावलेला असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘जगू आनंदे, निघू आनंदे’ या टॅगलाईनसह जगण्यासोबतच मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणारा फनरल चित्रपट आज रिलीज झाला.

या चित्रपटाने पीफ, इफ्फी, राजस्थान,कोकण यांसारख्या देश-विदेशांतील चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीनं एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपट रूपात मांडली आहे. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन आलेल्या ‘फनरल’ चित्रपटात आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, विजय केंकरे, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, हर्षद शिंदे, पार्थ घाटगे, सिद्धेश पुजारे यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटातील ‘विषय कट’ हे प्रेमगीत तसेच ‘पंखा फास्ट करू दे’ पार्टी सॉंग सध्या चांगलच गाजत आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड तर छायांकन अनुराग सोळंकी यांनी केले आहे. कलादिग्दर्शन मनोहर जाधव आणि महेश साळगांवकर यांचे आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत अद्वैत नेमळेकर तर साऊंडची जबाबदारी सूर्या मुकादम आणि गंधार मोकाशी यांनी सांभाळली आहे.

क्रीएटीव्ह दिग्दर्शक रमेश दिघे आणि श्रीपाद जोशी आहेत. असोशिएट निर्माते प्रदीप दिघे आहेत. कार्यकारी निर्माते प्रसाद पांचाळ तर सहाय्यक निर्माते विश्वास भोर व सचिन ढमाले आहेत. सहाय्यक दिग्दर्शक दीप व्यास तर चीफ सहाय्यक दिग्दर्शक डॉ. गिरीश मोगली आहेत.

Back to top button