

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातलगांनी केला होता. त्यानुसार विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीसह इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली अभिषेक देवकर (22, रा. नांदूर नाका) या विवाहितेने मंगळवारी (दि. 7) सकाळी 10.30 च्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी सुरुवातीस आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर सोनाली यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार फेब—ुवारी 2020 मध्ये झालेल्या विवाहानंतर तीन महिन्यांपासून सोनालीस तिचा पती अभिषेक याच्यासह अनिता कांतीलाल देवकर व संतोष कांतीलाल देवकर यांनी छळ केला.
भांडे संसार, सोन्याची अंगठी, घर बांधण्यासाठी व व्यवसायासाठी एक लाख रुपये आणण्याची मागणी तिघांनी केली. या कारणावरून कुरापत काढून तिघांनी सोनालीला वारंवार शिवीगाळ व मारहाण केली. या त्रासाला कंटाळून सोनालीने आत्महत्या केल्याचा आरोप आईने केला. त्यानुसार आडगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात सोनालीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.