पोलिस कन्येची खेलो इंडियात हॅटट्रिक;सातार्‍याच्या लौकिकात भर | पुढारी

पोलिस कन्येची खेलो इंडियात हॅटट्रिक;सातार्‍याच्या लौकिकात भर

सातारा : पुढारी वृत्तसेवा

पंचकूला, हरियाणा येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सातारच्या सुदेष्णा हणमंत शिवणकर हिने सुवर्ण पदकांची हॅटट्रिक साधली असून तिचे वडिल सातारा पोलिस आहेत. दरम्यान, सुदेष्णाला हरियाणाचे मुख्यमंत्री (सीएम) यांनी पदक देवून तिचा गौरव केला.
खेलो इंडिया स्पर्धामध्ये सुदेष्णा शिवणकर हिने 100 व 200 मीटर धावणे व चार बाय 100 रिले प्रकारात तिला सुवर्णपदक मिळाले आहे.

या स्पर्धेदरम्यान तिने 100 मीटर धावणे या प्रकारात स्वतःची वैयक्‍तिक कामगिरीतील सर्वोच्च 11.79 सेकंद अशी सर्वोत्कृष्ट वेळ नोंदवली. याशिवाय 200 मीटर धावण्यासाठी 24.29 सेकंद अशी वेळ नोंदवली. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रासाठी खेळताना सुदेष्णा हिने दाखवलेले प्रोत्साहन आणि घेतलेली मेहनत यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचे व सातारा जिल्ह्यासह खर्शी गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या यशामागे खंबीरपणे उभे राहणारे तिचे गुरु बळवंत बाबर व तिच्या वडीलांची अपार मेहनत आहे.

तिला अंतरराष्ट्रीय खेळाडू बनवण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्याच पद्धतीने तिचा सराव घेतला जात आहे. आता येत्या काळात सुदेष्णा आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून उदयास येऊ शकते. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्यासह पोलिस दलातूनही पोलिस हवालदार हणंमत शिवणकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. खेलो इंडियामधील स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी तिला पदक देवून सन्मानीत केले.

हेही वाचा :

Back to top button