सुशांतसिंह प्रकरणाची २१ ऑगस्टला सुनावणी  | पुढारी

सुशांतसिंह प्रकरणाची २१ ऑगस्टला सुनावणी 

मुंबई  : पुढारी वृत्तसेवा 

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना त्यात तूर्त हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी नकार दिला. सर्वोच्च न्यायालयात १८ ऑगस्टला सुनावणी निश्चित करण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी २१ ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी पोलिसांमार्फत सुरू असलेल्या तपासाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करून  समित ठक्कर यांनी उच्च न्यायालयात याचिका दखल केली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर आज प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारच्या वतीने संबंधित प्रकरणी सीबीआईने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती न्यायालयाला दिली. 

तसेच मुंबईत तपास करायला बाहेरच्या राज्यातून आलेल्या पोलिस अधिका-याला स्थानिक प्रशासनाने जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोपही केंद्र सरकारने न्यायालयात केला. यावेळी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना तूर्तास यासंदर्भात कोणतेही भाष्य करणे योग्य नाही असे स्पष्ट करून याचिकेची सुनावणी २१ ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली.

 

Back to top button