कंगनाचा नवा वाद; मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त मिम्स व्हायरल | पुढारी

कंगनाचा नवा वाद; मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त मिम्स व्हायरल

मुंबई: पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एक मिम्स व्हायरल करून नव्या वादाला खतपाणी घातले आहे. कंगनाने मुंबईत असुरक्षित वाटत असल्याचे म्हणत मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या बेताल वक्तव्यानंतर शिवसेनेविरुद्धचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने हा विषय आमच्यासाठी संपला आहे, असे म्हटले असले तरी कंगना मागे हटण्यास तयार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

काय आहे मीम्स?

कंगनाने मराठी भाषेत ट्विट करत एक मीम्स शेअर केली आहे. या मीम्समध्ये  छत्रपती शिवाजी महाराज झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना युद्धात उतरण्यापूर्वी तलवार प्रदान करताना दिसत आहेत. त्याचवेळी मिम्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावण असे संबोधले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या जेसीबी मशीनदेखील दाखवण्यात आले आहे.  तिच्या या मीम्समुळे नवा वाद उद्भवण्याची राजकीय वर्तृळात चर्चा आहे. 

काय म्हटले आहे ट्विटमध्ये?

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी शेअर केलेली मीम्स कंगानाने पोस्ट केले आहे. ही पोस्ट करताना कंगनाने ”लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र ” अशी कॅप्शन दिली आहे. 

तसेच, मला अनेक मीम्स मिळाले, त्यापैकी हा एक मला माझे मित्र विवेक अग्नीहोत्री यांनी पाठवला आहे. त्याने मी खूप भावूक झाली आहे. असे देखील तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेमके काय घडले??

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून कंगनाने सातत्याने मुंबई पोलिस आणि शिवसेनेवर टीका केली. मुंबई शहराला ‘पाकव्याप्त काश्मीर’ अशी उपमा देऊन शिवसेनेचा रोष ओढवून घेतला. दरम्यान, पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी तिच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली.

दरम्यान, कंगनाच्या वांद्रे, पाली हिल येथील कार्यालयातील नियमबाह्य बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी सकाळी हातोडा चालवला. सुमारे दोन तास चाललेली ही कारवाई, मुंबई उच्च न्यायालयातून स्थगितीचे आदेश आल्यानंतर थांबविण्यात आली. 

ऑफिस तोडल्यानंतर कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिले. कंगनानं ठाकरेंचा थेट एकेरी उल्लेख केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनाने आव्हान देणारी भाषा केली आहे. ‘उद्धव ठाकरे तुला काय वाटते, तू बॉलिवूड माफियांसोबत मिळून माझं घर उद्धवस्त करून मोठा बदला घेतला आहेस? आज माझे घर मोडले आहे, उद्या तुझा हा अहंकार मोडून पडेल,’ अशा शब्दांमध्ये कंगनाने मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. यासर्व घडमोडीनंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात वाद पेटत गेला.

Back to top button