रियाने थेट नाव घेतल्याने ‘या’ दोन अभिनेत्रींविरोधात ड्रग्ज चौकशीचा फास आवळणार? | पुढारी

रियाने थेट नाव घेतल्याने 'या' दोन अभिनेत्रींविरोधात ड्रग्ज चौकशीचा फास आवळणार?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगलवरुन तपास करत असलेल्या एनसीबीने ड्रग्ज डीलर्सवरील कारवाई सुरूच ठेवत आणखी तीन ड्रग्ज डीलर्सना बोड्या ठोकल्या. त्यामुळे आरोपींची संख्या 16 वर पोहचली आहे.

बॉलिवूडमधील ड्रग्ज सिंडिकेटचा छडा लावण्यासाठी आता एनसीबीने कंबर कसली आहे. एनसीबीने ड्रग्जच्या विश्वात ‘केजे’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ड्रग्ज डीलर आणि रियाचा भाऊ शोवीक याचा खास मित्र असलेल्या अंधेरीतील करनजीत सिंह याच्यासह दादरमधील ड्वेन अँथनी फर्नांडिस आणि पवईतील अंकुश अरेन्जा यांना रविवारी अटक केली. त्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्यापैकी संकेत पटेल, संदीप गुप्ता आणि आफताब अन्सारी यांना अटक केली आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या 16 वर पोहचली. यात बॉलिवूडला ड्रग्ज 12 ड्रग्ज डीलर्सचा समावेश आहे. 

अभिनेत्री रियाच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे एनसीबी अभिनेत्री सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासह फॅशन डिझायनर सायमन खंबाट्टा यांना चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज डीलर अनुज केसवानी याची न्यायालयाने 23 सप्टेंबरपर्यंत  न्यायालयिन कोठडीत रवानगी केली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोवीक यांच्या जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची घाई नसल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button