अभिनेत्रींना अद्याप क्लीन चिट नाही : एनसीबी | पुढारी

अभिनेत्रींना अद्याप क्लीन चिट नाही : एनसीबी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ड्रग्ज अँगलवरून तपास करत असलेल्या केंद्रीय अमली पदार्थ विभागाने (एनसीबी) कोणत्याही अभिनेत्रीला अद्याप क्लीन चिट दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. अभिनेत्री सारा अली खान हिने सुशांतला ड्रग्जचे सेवन करताना बघितल्याचे सांगितले असल्याने एनसीबी या अभिनेत्रींकडे पुन्हा चौकशी करण्याची शक्यता आहे.

सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी समोर आलेल्या ड्रग्ज अँगलवरून एनसीबी तपास करत आहे. एनसीबीने आतापर्यंत अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह 20 जणांना अटक केली आहे. एनसीबीने गेल्याच आठवड्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांची चौकशी केली आहे. चौकशीदरम्यान, साराने सुशांतला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ड्रग्जचे सेवन करताना बघितले होते. तर, श्रद्धा कपूर हिने सुशांतच्या फार्म हाऊसवर पार्टीच्या वेळी ड्रग्ज आणि दारू बघितल्याची कबुली दिली होती. तसेच, ड्रग्ज चॅटवरून एनसीबीने दीपिकाची सहा तास कसून चौकशी केली आहे. यात तिची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश हिच्यासोबतही चौकशी करण्यात आली आहे.

एनसीबी या अभिनेत्रींचे मोबाईल ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करत आहे. यात या अभिनेत्रींच्या मोबाईलमधून अद्याप त्यांचे ड्रग्ज डीलर्स आणि पेडलर्ससोबत संबंध समोर आलेले नाहीत.

Back to top button