सुशांतप्रकरणी हत्येचे कलम; सीबीआय तपासाला नवे वळण | पुढारी

सुशांतप्रकरणी हत्येचे कलम; सीबीआय तपासाला नवे वळण

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात तपास करत असलेला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) याप्रकरणी दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यात आता हत्येचे कलम वाढवून तपास करण्याची शक्यता आहे. सीबीआयने आतापर्यंत केलेला तपास आणि गोळा केलेले पुरावे तसेच एम्सच्या तज्ज्ञांच्या पथकाने दिलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिस, बिहार पोलिस यांच्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभाग (एनसीबी) याप्रकरणी गुन्हे दाखल करून तपास करत आहे. सीबीआयने याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासह अन्य संबंधितांकडे कसून चौकशी करत जबाब नोंद करून पुरावे ताब्यात घेतले आहे.

सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सीबीआयला ‘एम्स’च्या फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक मदत करत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन आणि वैद्यकीय पुरावे गोळा करण्यावर एम्सच्या तज्ज्ञांच्या पथकाने प्रश्‍न उपस्थित केले आहेत. तसेच सुशांतच्या मृत्यूची नेमकी वेळसुद्धा त्यांनी शवविच्छेदन अहवालात नमूद न केल्याचे अधोरेखित केले आहे. त्यामुळे या प्रकरणात सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून अहवाल सादर करणार्‍या डॉक्टरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवून तपास करण्याची शक्यता आहे. यासाठी सीबीआय सुशांतचा मित्र आणि रूम पार्टनर सिद्धार्थ पिठाणी याला चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स बजावून त्याचा कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवून घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Back to top button