पुढारी ऑनलाईन डेस्क
बऱ्याच कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा प्रत्येक व्यक्तीला एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे हे सोपं वाटणारं प्रेम अजिबात नाही. त्यात येणारी वादळे कधी दिशा भरकटवतील हे सांगणाऱ्या 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत तू आणि मी, मी आणि तू या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते या तू आणि मी, मी आणि तू चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
या चित्रपटातून रुपालीताई यांचा मुलगा सोहम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. सोहमच्या वाढदिवशी आई मुलाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरचे त्याच्या आईच्या म्हणजेच रुपालीताईंच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच प्रेमालाही आहेत. प्रेम करणं ते टिकवणं आणि निभावणं या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत. या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा ठाकरे आणि अभिनेता सोहम चाकणकर यांच्या फ्रेशजोडीने करून दिली. शिल्पाने आजवर बऱ्याच मराठी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
सोहम या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकत आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता शिल्पा आणि सोहमची लव्हेबल केमिस्ट्री कशी असेल याचा अंदाज येतोय. 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत निर्माते सागर जैन, ऋषभ कोठारी, राजू तोडसाम निर्मित आणि दिग्दर्शक कपिल जोंधळे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा लेखक नितीन सूर्यवंशी लिखित आहे. तर चित्रपटाचे संगीताची बाजू संगीतकार प्रशांत सातोसे यांनी सांभाळली आहे, तसेच या चित्रपटाचा उत्तम असा कॅनव्हास व्यंकेट कुमार यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
प्रेमाची आगळीवेगळी कथा घेऊन येत शिल्पा आणि सोहमची जोडी रसिक प्रेक्षकांवर राज्य करण्यास चित्रपटातून सज्ज झाली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे.