

सांगली ; पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे हिंदुत्वच खरे हिंदुत्व आहे. मात्र भाजप हिंदुत्वाचा बुरखा पांघरून त्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी करीत असल्याची टीका शिवसेनेच्या खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. भाजपचे सरकार जिथे नाही, त्याठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो. त्यामुळे तपास यंत्रणांचे नागरिकांत हसे झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. येथे शिवसंपर्क अभियानानिमित्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीनंतर खा. चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हाप्रमुख संजय विभुते, आनंदराव पवार, दिगंबर जाधव, बजरंग पाटील, हरिदास लेंगरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खा. चतुर्वेदी म्हणाल्या, सरकारमध्ये आम्ही आघाडीचा धर्म पाळून काम करीत आहे. कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. कोणाला घाबरत नाही. शिवसेनेचे हिंदुत्ववाद म्हणजे समाजकारण आहे. हिंदुत्ववासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. भाजप केवळ लोकांचे लक्ष विचलित करीत आहे. बेरोजगारी, वाढती महागाई, देशाची परिस्थिती या सर्वांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. केवळ हिंदुत्ववादाचा मुद्दा उपस्थित करून लक्ष विचलित करत आहे. यांनी फक्त हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरला आहे. परंतु त्यांच्या रक्तात हिंदुत्व नाही.
भाजपाकडून सतत सरकार पडेल असे बोलले जात होते. मात्र, आमचे सरकार पडणार नाही तर आणखी मजबूत होईल. सरकार पाडण्यासाठी प्रत्येकवेळी प्रयत्न केले जात आहेत. ते सर्व प्रयत्न हे सरकार अपयशी करीत आहे. विकासकामात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमीच अव्वल आहेत. त्यांच्यावर टीका होत असल्या तरी कामाकडे लक्ष देतात. मुख्यमंत्र्यांनी विधवा प्रथेविरोधात ठराव आणला. ही महिलांना सन्मान देणारी शिवसेना आहे. केंद्राकडून जीएसटी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. संजय राऊत यांचा महाराष्ट्रासाठी मोठा त्याग आहे. त्यामुळे त्यांच्यामागे वेगवेगळ्या चौकशा लावल्या जात आहे. नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाविरोधात ते आवाज उठवतात. म्हणून राऊत यांच्यामागे केंद्रीय एजन्सी लावल्या जात आहेत.
खा. चतुर्वेदी म्हणाल्या, खा. सुप्रिया सुळे या महाराष्ट्राचा आवाज संसदेत उठवितात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महिलांविषयी जे बोलले ते निंदनीय आहे. भाजपा नेत्यांकडून महिलांबाबत अभद्र भाषा वापरली जाते. हीच भाजपाची मानसिकता आहे. महिलाविरोधी भाजपा नेत्यांची विचारसरणी आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करणार्यांची मानसिक विकृती दिसून येते. चंद्रकांतदादा पाटील यांनी देशाच्या प्रत्येक महिलांची माफी मागितली पाहिजे.