‘किंग शिवाजी’ : अंतिम सामन्यात पीटीएमवर 2-0 ने मात | पुढारी

‘किंग शिवाजी’ : अंतिम सामन्यात पीटीएमवर 2-0 ने मात

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : हजारो फुटबॉल शौकिनांच्या उत्साही उपस्थितीत अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीने रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने पाटाकडील तालीम मंडळाचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून ‘राजर्षी शाहू चषक’ फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. दोन्ही गोल करण चव्हाण-बंदरे याने नोंदवत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सुरू असणार्‍या ‘कृतज्ञता पर्व’ अंतर्गत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली. शिवाजी मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम यांच्यातील अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळ झाला. शिवाजीकडून योजनाबद्ध चाली रचत आघाडीसाठी लागोपाठ खोलवर चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 24 व्या मिनिटाला फ्री किकचा फटका पाटाकडीलच्या गोलरक्षकाने रोखला. रिबाँड बॉलवर करण चव्हाण-बंदरे याने गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

पहिल्या गोलनंतर दोन्ही संघांतील खेळाडू व संघ व्यवस्थापकात धक्काबुक्की व एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाल्याने सामना सुमारे अर्धा तास थांबला होता. सामना सुरू झाल्यानंतर 51 व्या मिनिटाला करण चव्हाण-बंदरे याने मोठ्या डी बाहेरून मारलेल्या उत्कृष्ट फटक्याने पीटीएमच्या गोलपोस्टचा अचूक वेध घेतला. यामुळे शिवाजी मंडळला 2-0 अशी आघाडी मिळाली. पाटाकडीलकडून गोल फेडण्यासाठी अटीतटीचे आणि शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र, शिवाजीच्या भक्कम बचावामुळे अखेरपर्यंत त्यांना एकाही गोलची परतफेड करता आली नाही.

बालगोपाल तृतीय स्थानी

तृतीय क्रमांकासाठीच्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठचा 3-0 असा पराभव केला. त्यांच्या ऋतुराज पाटीलने दोन तर अक्षय सरनाईकने एका गोलची नोंद केली. लढवय्या खेळाडू म्हणून अक्षय सावंत (जुना बुधवार) याला गौरविण्यात आले.

Back to top button