Rani Mukerji : 'गुलाम'मध्ये राणीचा आवाज डब करून आमिरकडून झाली होती मोठी चूक? | पुढारी

Rani Mukerji : 'गुलाम'मध्ये राणीचा आवाज डब करून आमिरकडून झाली होती मोठी चूक?

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने १९९७ मध्ये राजा की आयेगी बारात या चित्रपटातून पदार्पण केले होते. परंतु करण जोहरच्या कुछ कुछ होता है या चित्रपटाने तिला इतकी लोकप्रियता मिळाली की, तिच्या सौंदर्यासोबतचं आवाजाचीही चर्चा होऊ लागली. तिच्या आवाजातील वेगळेपणामुळेही तिला प्रसिध्दी मिळाली. सुरुवातीला तिच्या आवाजामुळेच राणी मुखर्जी हे नाव सर्वश्रुत झाले. पण, तुम्हाला माहितीये का, तिला तिच्या आवाजावरून ट्रोल व्हावे लागले होते. चित्रपटसृष्टीतही तिचा आवाज स्वीकारला जात नव्हता. अगदी गुलाम चित्रपटावेळीही तिचा आवाज चित्रपटात द्यायचं नाही, असं ठरलं. आज राणी मुखर्जीचा वाढदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊया हा अनोखा किस्सा!

गुलाम हा चित्रपट कुछ कुछ होता है च्या काही महिन्यांपूर्वी रिलीज केला होता. राणीला ‘आती क्या खंडाला’ गर्ल म्हणून ओळखले गेले. पण, गुलाममध्ये राणीचा खराखुरा आवाज देण्यात आला नाही. हा आवाज एका व्हॉईस ओव्हर आर्टिस्टने चित्रपटात डब केला होता, हे कदाचित खूप कमी लोकांना माहित असेल.

राणीने २०१८ मध्ये एका मुलाखतीत शेअर केले होते की, आमिर खान, मुकेश भट्ट आणि महेश भट्ट यांच्या चित्रपटातही डबिंग केले होते. तिने एका इंग्रजी वेबसाईटला सांगितले होते की, “कदाचित माझ्याकडे त्या काळातील हिरोईन्ससारखा सुरेल, छान आणि सुंदर आवाज नव्हता.”

करणचा तो निर्णय ठरला योग्य

एकदा आमिर खानने तिच्याशी चर्चा केली. तिला सांगितले की, अनेक चित्रपटांमध्ये श्रीदेवींचा आवाजदेखील डब केला गेला आहे. म्हणून कोणीतरी तुझ्यासाठी डब करणे योग्य आहे. राणीला वाटले की, हे योग्य आहे आणि ती नवीन असल्याने तिला पर्याय नव्हता. राणी म्हणाली होती-गुलाम आणि कुछ कुछ होता है चे एकाच वेळी शूट केले जात होते. जेव्हा करण जोहरच्या चित्रपटासाठी डबिंग सुरू करण्याची वेळ आली तेव्हा करणने तिला विचारले की, आमीर खानच्या चित्रपटात तिचा आवाज इतर कोणीतरी डब करत आहे का? “मी त्याला सांगितले की माझा आवाज चांगला नाही असे त्यांना वाटते. करणने एक निर्णय घेतला आणि त्या प्रकाराने सर्व काही बदलले. कुछ कुछ होता है लोकप्रिय चित्रपट ठरला. सर्वांनी माझा आवाज स्वीकारला.

आमिरला झाला पश्चाताप?

इंडस्ट्रीत आणि प्रेक्षकांनी तिच्या आवाजाला स्वीकारले. आमिरने तिला कॉल केला आणि कबूल केले की त्याने तिचा आवाज डब करून मोठी चूक केली. राणी म्हणाली की, मला आठवतयं की, कुछ कुछ होता है पाहिल्यानंतर आमिरने मला कॉल केला होता. तो म्हणाला- ‘बेब्स, मला वाटते की आम्ही तुझा आवाज डब करून खूप मोठी चूक केली आहे. आणि तुझा आवाज खरोखर चांगला आहे.’ माझ्यासाठी, तो खरोखरच आश्चर्यकारक क्षण होता, कारण मी त्याचा खूप आदर करते. त्याने फोन केला आणि त्याने चूक केल्याचे सांगितल्यानंतर एक नवोदित म्हणून माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.

कुछ कु होता है चित्रपटाील कलाकार – राणी, शाहरुख आणि काजोल

राणी आणि आमिरने नंतर मन, मंगल पांडे : द रायझिंग आणि तलाश या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

Back to top button