कराड : शरद पवारांकडून आठवणींना उजाळा | पुढारी

कराड : शरद पवारांकडून आठवणींना उजाळा

कराड : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची मतदान प्रक्रियेने निवड झाल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्ली येथे भेट घेतली. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही नुतन पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. दरम्यान पदाधिकार्‍यांचे शरद पवार यांनी अभिनंदन करीत मार्गदर्शन केले.

जवळपास अडीच तास चर्चा चालली. प्रत्येक पदाधिकार्‍यासोबत शरद पवार यांनी संवाद साधला. शिवराज मोरे यांनी विद्यार्थी काँग्रेस मधील क्षण, विविध आंदोलने तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदाची गवसणी याबाबत शरद पवार यांना माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी शिवराज मोरे यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले.

आपल्या राजकारणाची सुरुवात युवक काँग्रेस मधून झाली असे सांगत शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाला एक विचार आहे, मूल्ये आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसची पिछेहाट होत असली तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा नवीन उमेदीने हा पक्ष उभा राहील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button