कराड : पर्यावरण रक्षणासाठी कराडकरांचे पाऊल पुढे | पुढारी

कराड : पर्यावरण रक्षणासाठी कराडकरांचे पाऊल पुढे

कराड : पुढारी वृत्तसेवा
वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणाचा र्‍हास कमी करण्यासाठी काही सजग नागरिकांनी कराड पालिकेच्या सहकार्याने दहन परंपरेसाठी पर्यावरणपुरक पर्याय निवडला आहे. पर्यावरण रक्षणाची गरज ओळखून दहनासाठी झाडांचा पालापाचोळा, ऊसाच्या चोयट्या, बगॅस अशा बायोवेस्टमधून अग्निकाष्ठ नावाचे सरपण उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे वसुंधरा बचाव उपक्रमास चालना मिळणार असून कराड नगरपालिका व पर्यायाने कराडकर नागरिकांच्या पर्यावरण जनजागृतीचे कौतुक होणार आहे.

एका दहनासाठी दोन पूर्ण वाढ झालेले वृक्ष तोडावे लागतात. म्हणजे आपल्या कोट्यवधी लोकसंख्येच्या देशात रोजचे लाखो मृत्यू होत असतील तर तेवढ्या प्रमाणात वृक्षतोड होत जाणार आहे. यामुळे वृक्षांवर अवलंबून असलेल्या प्राणी, पक्षी व पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. हा संभाव्य धोका ओळखून कराडमधील काही सजग नागरिकांनी पालिकेच्या सहकार्याने दहन परंपरेसाठी एका वेगळ्या माध्यमाचा विचार केला आहे. वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणाचा र्‍हास कमी करण्यासाठी झाडांचा पडलेला पालापाचोळा, ऊसाच्या चोयट्या, बगॅस अशा बायोवेस्टमधून अग्निकाष्ठ नावाचे सरपण उपलब्ध करण्यात आले आहे. या सरपणामुळे लाकडाची बचत होणार आहे. पर्यायाने वृक्षतोड थांबणार आहे. प्रति कि. 10 रु. दराने हे सरण उपलब्ध होणार असून एका मृतव्यक्तीस दहनासाठी 150 ते 200 किलो सरण लागते. या सरणासाठी एक लिटर रॉकेल किंवा डिझेल लागते. बाकी अन्य वस्तू उदा. खोबरे, तुप, कापूर वगैरे लागत नाही. एका दहनाचा खर्च जास्तीत जास्त 2000 रूपये होईल. हे सरण नगर पालिकेच्या सहकार्याने स्मशानभूमीत उपलब्ध होईल. ही सुविधा पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कराडमध्ये उपलब्ध होत आहे.केंद्र सरकारच्या पर्यावरण समितीने सुद्धा या उपक्रमाचे कौतुक केले आहे. नागपूर सारख्या शहरात त्याचा नियमित वापरही होत आहे. जे काळाप्रमाणे बदलते ते काळासमोर टिकते, हा निसर्ग नियम आहे. दहन परंपरेत काळाप्रमाणे काही बदल करावे लागणार आहेत. या बदलासाठी तयार करण्यात आलेले अग्निकाष्ठ हे अतिशय उपयुक्त असून त्याची उपलब्धता, त्याची किंमत, ज्वलनशीलता व त्याच्या तापमानाचा निर्देशांक या सर्व कसोटींवर ते उत्तमरीत्या उतरले आहे.

काळानुरूप बदल करायला हवा..

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या शहराला सातत्याने जे मानांकन प्राप्त झाले आहे ते या उपक्रमामुळे अधिक गौरवास्पद ठरणार आहे. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही कराडकरांना आवाहन करतो की आपण आपले आप्त स्वकीय, मित्र, शेजारी यांच्या दहनासमयी अग्निकाष्ठ पद्धतीचा वापर करावा व आपल्या वसुंधरेच्या पर्यावरण संवर्धनाला सहकार्य करण्याच्या या प्रयत्नात सहभागी व्हावे, असे आवाहन अग्निकाष्ठ सरण समितीचे विनायक पावसकर, महेंद्रकुमार शाह, सुरेश पटेल, सुधीर एकांडे यांनी केले आहे.

Back to top button