‘तान्हाजी’नंतर ‘पावनखिंड’चा थरार, प्रेक्षकांची प्रचंड पसंती

pavankhind movie
pavankhind movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या आदल्या दिवसाचा सुर्योदय मराठी सिने रसिकांसाठी एक अनोखी भेट घेऊन प्रगटला. मराठी मुलुखात मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पावनखिंड चित्रपट प्रदर्शित झाल्याचा आनंद आज चहूदिशांना पहायला मिळत आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाहण्यासाठी तमाम शिवप्रेमी व मराठी रसिक गर्दी करत आहेत. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सिनेमागृहांमध्ये 'पावनखिंड'च्या शोला प्रेक्षकांनी तूफान गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

मराठमोळा पोषाख, नऊवारी साडी, फेटे, ढोल-ताशे आणि तुताऱ्यांच्या निनादात 'पावनखिंड'चे शो पाहिले जात आहेत. पावनखिंड चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदविला गेला आहे. पहिल्याच दिवशी १५३० शोजसह पावनखिंड चित्रपटगृहात दाखल झाला तर शनिवारी ४२१ चित्रपटगृहांमध्ये १९१० शोज एवढया विक्रमी संख्येने पावनखिंडची जोरदार घौडदौड़ सुरु आहे.

आलमंड्स क्रिएशन्स निर्मित आणि ए. ए. फिल्म्स प्रस्तुत पावनखिंड या चित्रपटाला 'फर्स्ट डे फर्स्ट शो' पासून मिळत असलेलं रसिकांचं प्रेम पाहून अनेकांना 'तान्हाजी' चित्रपटाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाची आठवण होत आहे. पहिल्या दिवसाचं चित्र पाहता 'पावनखिंड' या चित्रपटानेही सुरुवातीपासूनच एका ऐतिहासिक विजयाच्या दिशेनं कूच केल्याचं बोललं जात आहे.

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या दिग्दर्शनाखाली 'पावनखिंड' या चित्रपटात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची यशोगाथा पहायला मिळत आहे. लॅाकडाऊन आणि निर्बंधांमुळं प्रदर्शनापासून वंचित राहिलेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती.

दिग्पालनं यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या यशस्वी चित्रपटांची पुण्याई 'पावनखिंड'च्या मागं उभी असल्यानं अपेक्षा खूप वाढल्या होत्या. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली होती.

पहिल्या दिवशी सिनेप्रेमींनी 'पावनखिंड' पाहण्यासाठी केलेली गर्दी हा त्याचाच परिपाक असल्याचं चित्रपट माध्यम आणि व्यवसायतज्ज्ञांचं म्हणणं आहे. सरकारी नियमांनुसार ५० टक्के आसनक्षमता असताना 'पावनखिंड'ला मिळणार प्रतिसाद नेत्रदीपक असून, हा मराठी सिनेसृष्टीसाठी शुभशकून मानला जात आहे.

या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, रुची सावर्ण, उज्ज्वला जोग, सुरभी भावे, माधवी निमकर, दिप्ती केतकर, प्राजक्ता माळी, वैभव मांगले, हरीश दुधाडे, विक्रम गायकवाड, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, शिवराज वायचळ, राजन भिसे, सुश्रुत मंकणी या कलाकारांसोबतच संतोष जुवेकरनं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. छायांकन अमोल गोळे यांनी केलं असून, संकलन प्रमोद कहार यांचं आहे. दिग्पाल लांजेकर, देवदत्त मनिषा बाजी यांच्या गीतरचनांना संगीत देताना देवदत्त मनिषा बाजी यांनी पार्श्वसंगीतही दिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news