सातारा जिल्हा आपल्याला भगवा करायचाय, आदित्य ठाकरे यांची शेखर गोरेंना साद | पुढारी

सातारा जिल्हा आपल्याला भगवा करायचाय, आदित्य ठाकरे यांची शेखर गोरेंना साद

दहिवडी : पुढारी वृत्तसेवा; शेखरजी जिल्हा बँकेत तुमच्या रुपाने आपल्या भगव्याचा प्रवेश झाला असून जिल्ह्याच्या राजकारणात ही शिवसेनेची ताकद वाढवत एक दिवस आपल्याला जिल्हा भगवा करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून कामाला लागा, असे पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांना सूचना केल्या.

सातारा येथे एका कार्यक्रमानिमित्त पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या ना. निलमताई गोर्‍हे, गृहराज्यमंत्री ना. शंभूराजे देसाई, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आ. महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सुनिल खत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्ह्यात पाटण व खटाव मतदारसंघात शिवसेनेचे दोन आमदार असून राज्यात नावलौकीक मिळवलेल्या सातारा जिल्हा बँकेत शेखर गोरे यांच्या रुपाने शिवसेनेच्या संचालकाने प्रवेश केला आहे. त्याबद्दल पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शेखर गोरेंचा सत्कार करण्यात आला.

शेखर गोरे म्हणाले, जिल्हा बँकेत राष्ट्रवादीने भाजपला बरोबर घेत शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यात व मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवत असताना राष्ट्रवादी कुटील कारस्थाने करत अडवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात महाविकास आघाडी बरोबर असताना राष्ट्रवादी जिल्हा बँकेत विश्‍वासात घेत नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आम्ही बँकेत कार्यक्रमाला गेलो नाही. आम्ही विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

ना. आदित्य ठाकरे यांच्या स्वप्नातला जिल्हा भगवा करण्यासाठी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यात आम्ही शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेना आपली ताकद दाखवून देईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या राजकारणावर कमराबंद चर्चा…

ना. आदित्य ठाकरे, शिवसेना नेत्या ना. निलमताई गोर्‍हे यांनी विश्रामगृहात जिल्ह्यातील नेते गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, आ. महेश शिंदे, जिल्हा बँक संचालक शेखर गोरे यांच्याशी कमराबंद चर्चा केली. यावेळी आगामी नगरपालिका व जि.प., पं.स. निवडणुकांबाबत शिवसेनेची रणनीती ठरवण्यात आली.

शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या वागणुकीची तक्रार…

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सापत्नपणाची वागणूक देत असल्याची तक्रार आ. महेश शिंदे व जिल्हा बँक संचालक शेखर गोरे यांनी केली. आपले गृहराज्यमंत्री, शिवसेना नेते, आमदार, पदाधिकार्‍यांना महाविकास आघाडीच्या विविध कार्यक्रमात विश्‍वासात घेतले जात नाही. जिल्हा बँक कमिटीतही घेतले जात नाही.

नगरपंचायतीला दिलेले शब्द पाळत नाहीत. राष्ट्रवादी फक्‍त आपला वापर करुन घेत इतरवेळी दुजाभाव करत आहेत. अशा तक्रारी करण्यात आल्या. याबाबत ना. आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या विषयावर शिवसेना व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक लावण्याचे आश्‍वासन दिले.

हेही वाचलंत का? 

Back to top button