

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून राजकारण रंगलेले असतानाच त्यांच्या नावाने मुंबईतील कलिना कॅम्पस परिसरात आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती उच्च व तंत्रज्ञानमंत्री उदय सामंत यांनी दिली. या महाविद्यालयाचे नाव 'भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर' असे ठेवण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील तीन एकरांत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे.
ठाकरे सरकारने दीड वर्षापूर्वी मुंबईत दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत माहिती देताना उदय सामंत म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचे संगीत महाविद्यालय असावे, असे लतादीदींचे स्वप्न होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन तशा सूचना केल्या होत्या. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव 'भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर' असे असावे असा प्रस्ताव दिला असल्याचे सामंत यांनी सांगितले.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दुसर्याच दिवशी त्यांचे शिवाजी पार्कवर स्मारक करण्याच्या मागणीवरून वाद उफाळून आला. भाजपने शिवाजी पार्कमध्येच लतादीदींचे स्मारक उभारावे, अशी मागणी केली होती. त्याला काँग्रेसने पाठिंबा तर मनसे, वंचित बहुजन आघाडीने विरोध केला. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, लतादीदी या भारतरत्न होत्या. त्यामुळे त्यांचे भव्य स्मारक भारत सरकारने उभारले पाहिजे, असे सांगत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. लतादीदींच्या स्मारकावरून वाद सुरू असतानाच लतादीदींच्या नावाने संगीत विद्यालय उभारून हा वाद निवळण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.