चुलत मेहुण्यानेच संपविले शालकाला ; लासलगाव-मनमाड रोडवरील खुनाची उकल | पुढारी

चुलत मेहुण्यानेच संपविले शालकाला ; लासलगाव-मनमाड रोडवरील खुनाची उकल

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : लासलगाव ते मनमाड रस्त्यालगत वागदर्डी धरणाजवळ झालेल्या खुनाच्या गुन्ह्याची उकल अवघ्या दोन दिवसांत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून चुलत मेहुण्यानेच शालकाचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित आरोपीला अटक झाली असून, त्याला मालेगाव न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मालेगाव दौर्‍यावर असलेल्या पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी बुधवारी (दि.9) सुसंवाद हॉलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चांदवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा घडला होता. तीक्ष्ण हत्याराने अज्ञात व्यक्तीचा खून करून रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला होता. सोमवारी (दि.7) गुन्हा दाखल होऊन तपासाला गती देण्यात आली. घटनास्थळाजवळच एक बेवारस दुचाकी मिळून आली होती. तिच्या नंबर प्लेटवरून मालकाचा शोध घेतला गेला असता ती दीड वर्षापूर्वीच विक्री झाल्याचे पुढे आले. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. एका कॅमेर्‍यात मयत एका व्यक्तीसमवेत जाताना दिसून आले. त्याचा माग काढण्यात आला असता तो गंगावे (ता. चांदवड) येथील दत्तात्रय विश्वनाथ उबाळे हा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला गावातून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तांत्रिक आधारे पुरावे जुळविण्यात आले. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

दोघात साल्या-मेहुण्याचे नाते आहे. उबाळे याचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेशीच अनिल रतन आहिरे याने संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. याच्या रागातून उबाळे याने कट रचत त्याला दुचाकीवरून वागदर्डी परिसरात नेऊन तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केला. त्याला अटक होऊन न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

पाच फरार जेरबंद
गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात फरार आरोपी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यात येवला, घोटी, किल्ला, मनमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच आरोपींना पकडण्यात आले आहे. अजूनही काही फरार आरोपी रडावर असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button